CoronaVirus: 'डॉक्टरांना मोफत उपचारांची सक्ती करू नये'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:04 AM2020-04-19T04:04:06+5:302020-04-19T04:04:26+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशन; शासनाला निवेदन सादर
पुणे : राज्यातील अनेक भागांमध्ये शासनाची रुग्णालये ‘कोव्हिड’ रुग्णालयांमध्ये रूपांतरीत करण्यात आली आहेत. या काळात खासगी क्षेत्रातील डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र, खासगी डॉक्टर आर्थिक ताण सोसत असताना त्यांच्यावर मोफत उपचारांची सक्ती करू नये, अशा आशयाचे आवाहन आयएमएचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले आहे.
संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र सध्या कोरोनाविरोधातील लढाई नेटाने लढत आहेत. खासगी डॉक्टरही शासनाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. मात्र, खासगी डॉक्टरांनी सर्वसामान्य रुग्णांवर मोफत उपचार करावेत, ही शासनाची अपेक्षा काहीशी अयोग्य असून त्याबाबत पुर्नविचार करण्यात यावा, असे आवाहन इंडियन मेडिकल कौन्सिलने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना केले आहे.
शासनाकडे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्यरत आहेत. शासनाने स्वतंत्र यंत्रणा तयार करून, रुग्णांना सुविधा द्यावी, असेही आएमएने म्हटले आहे.
आयएमएतर्फे मोठ्या शहरांमध्ये कम्युनिटी क्लिनिक, छोटी शहरे आणि तालुक्यांमध्ये रक्षक दवाखाने सुरू करण्यात येत आहेत. शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आयएमएची ५० मोबाईल क्लिनिक कार्यरत असतील. कोव्हिड रुग्णांसाठी असलेल्या हाय डिपेंडन्सी सेंटरमध्ये आयएमएचे सदस्य काम पाहण्यास सज्ज आहेत.