coronavirus : लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 07:32 PM2020-04-12T19:32:20+5:302020-04-12T19:33:22+5:30

लाॅकडाऊनमुळे सर्वचजण घरी असल्याने घरगुती वाद आणि हिंसाचारामध्ये माेठी वाढ झाली आहे. नारी समता मंचाने ही वाढ लक्षात घेऊन विशेष हेल्पलाईनही सुरु केली आहे.

coronavirus: Domestic violence increased during lockdown rsg | coronavirus : लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले

coronavirus : लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले

Next

प्रज्ञा केळकर-सिंग 

पुणे : रोजंदारीवर झालेला परिणाम, काम जाण्याची भीती, लहान घर आणि मोठे कुटुंब असल्याने होणारी कुचंबणा असे अनेक प्रश्न लॉकडाऊनच्या काळात उभे राहिले आहेत. याचाच थेट परिणाम म्हणून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विविध संस्थांच्या हेल्पलाईनवर येणा-या फोनचे प्रमाण २०-३० टक्क्यांनी वाढले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने प्रसिध्द केलेल्या अहवालात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आले आहे. 

केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंबातील महिलेशी होणारे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, आर्थिक गैरवर्तनाचे अर्थात घरगुती हिंसाचाराचे प्रमाण वाढले आहे. नारी समता मंचाने ही वाढ लक्षात घेऊन विशेष हेल्पलाईनही सुरु केली आहे. याशिवाय, महाराष्ट्र राज्य महिला बाल कल्याण विभागातर्फेही हेल्पलाईन सुरु करण्यात आल्या आहेत. या  संपर्क क्रमांकांवर तक्रारींचे प्रमाण वाढले आहे. 

लॉकडाऊनमुळे कुटुंबातील सर्व व्यक्ती २४ तास घरातच असल्याने अनेक महिला हेल्पलाईनपर्यंत पोहोचू शकत नसल्याचे वास्तवही नाकारता येणार नाही, असे निरिक्षण नारी समता मंचाच्या प्रीती करमरकर यांनी नोंदवले. राष्ट्रीय महिला आयोगाने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार,गेल्या १५ दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या २५७  तक्रारी आल्या असून, त्यापैकी ६९ तक्रारी घरगुती हिंसाचाराच्या आहेत. आपल्या आजूबाजूला अशा अत्याचाराच्या घटना घडत असतील तर पुढाकार घेऊन मदत करण्याचे आवाहनही विविध संस्थांकडून केले जात आहे. 

अत्याचार हा सार्वजनिक आरोग्याचा विषय आहे. त्यामुळे आपण जागरुक राहिले पाहिजे, एकमेकांना मदत केली पाहिजे, अत्याचार होणा-या घरातील महिलेला योग्य  व्यक्ती किंवा संस्थेशी संपर्क साधण्यासाठी मदत केली पाहिजे,  अशा सूचना विविध माध्यमांमधून केल्या जात आहेत. तुमच्या घरात अत्याचार होत असल्यास विश्वासू व्यक्तीशी बोला, महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान वस्तू अत्याचार करणा-या व्यक्तींपासून दूर ठेवा, अनैच्छिक गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधके वापरा, हे संदेश महिलांपर्यंत पोहोचवले जात आहेत. 

लॉकडाऊनच्या काळात मानसिक पाठिंबा देण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या मनोबल विकास गटालाही घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींचे फोन येत आहेत. संस्था, समुपेदशक मदतीचा प्रयत्न करतच आहेत. महिलांनी अशा समस्यांबाबत मैत्रिणीशी, शेजारच्या विश्वासू व्यक्तीशी अथवा नातेवाईकांशी संवाद साधला पाहिजे. संवाद साधल्याने दु:ख हलके होते आणि घरगुती हिंसाचाराबद्दल इतर कोणाला तरी कल्पना देऊन ठेवल्याने अत्याचार करणा-या व्यक्तीवरही दबाव निर्माण होतो. 

- गौरी जानवेकर, समुपदेशक 

हेल्पलाईन्सची माहिती घरगुती हिंसाचार राष्ट्रीय हेल्पलाईन : १८१ महिलांसाठी हेल्पलाईन : १०९१/१२९१ स्वयम : ९८३०७७२८४१ महिला आणि बालविकास विभाग : ९८७०२१७७९५
 

Web Title: coronavirus: Domestic violence increased during lockdown rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.