coronavirus : जीवनावश्यक गाेष्टी चालूच राहणार, गर्दी करु नका : पुणे जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:28 PM2020-03-24T23:28:45+5:302020-03-24T23:30:21+5:30
देश लाॅकडाऊनच्या घाेषणेनंतर अनेक लाेक विविध गाेष्टी घेण्यासाठी घराबाहेर पडल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेर न पडण्याचे आवाहन केले.
पुणे : लाॅकडाऊन म्हणजे जीवनावश्यक गाेष्टींची दुकाने बंद राहणार असे नाही. ही दुकाने नियमित सुरु राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊन गर्दी करु नये असे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी केले आहे. एका व्हिडीओद्वारे त्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी रात्री आठ वाजता देशाला संबाेधित केले. काेराेनाचा प्रभाव देशात वाढत असल्याने पुढील 21 दिवस देश लाॅकडाऊन करत असल्याचे जाहीर केले. या त्यांच्या घाेषणेनंतर अनेक शहरांमधील नागरिक घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडले. त्यामुळे माेठी गर्दी किराना मालाच्या दुकानांमध्ये झाली हाेती. त्यामुळे एकत्र न येण्याच्या मूळ उद्देश बाजूला राहिला.
त्यामुळे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले, पंतप्रधानांनी देशभरात लाॅकडाऊन जाहीर केले आहे. परंतु राज्यात या आधीच लाॅकडाऊन करण्यात आले आहे. लाॅकडाऊन याचा अर्थ उद्यापासून जीवनावश्यक वस्तू मिळणा नाही असे काहीही नाही. आज अनेक लाेक पंतप्रधानांच्या घाेषणेनंतर जीवनावश्यक गाेष्टी घेण्यासाठी बाहेर पडले हे चुकीचे आहे. यापुढे देखील किराना मालाची दुकाने, भाजीपाला सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करु नये. जीवनावश्यक कुठलिही गाेष्ट बंद राहणार नाही याची नागरिकांनी नाेंद घ्यावी.