CoronaVirus : लस शोधण्यासाठी ८३ संस्थांचे प्रयत्न, ६ ठिकाणी मानवी चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 02:39 AM2020-04-26T02:39:43+5:302020-04-26T06:34:52+5:30
भारतासह जगभरातील ८३ कंपन्या औषध तयार करण्यासाठी काम करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
विशाल शिर्के
पुणे : जगभरात ‘कोविड-१९’चा फैलाव वेगाने होत असून त्यावर लवकरात लवकर लस शोधण्यासाठी संशोधक आणि औषध कंपन्या अहोरात्र झटत आहेत. भारतासह जगभरातील ८३ कंपन्या औषध तयार करण्यासाठी काम करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले. यातील ६ संस्था लशीची मानवी चाचणी करीत आहेत. तर, ७७ कंपन्यांची प्रयोगशाळेत चाचण्या सुरू आहेत.
शुक्रवारी दुपारपर्यंत जगभरातील बाधितांची संख्या २७ लाख २० हजारांवर पोहोचली होती. मृतांचा आकडाही १ लाख ९२ हजारांवर गेला. भारतातील बाधितांचा आकडा शुक्रवारी दुपारी २३ हजार ५०० वर गेला होता. त्यात मृतांची संख्या ७२२ असून, पाच हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी त्यावर लवकर लस शोधणे, हाच प्रभावी उपाय आहे. त्यासाठी औषध कंपन्या विविध नामांकित विद्यापीठातील शास्त्रज्ञ झटत आहे. चीन, ब्रिटन आणि अमेरिकेमधे काही रुग्णांवर चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. मात्र, प्रत्येक अपयश आणि मार्यादित स्वरूपाच्या यशामधून प्रभावी लसनिर्मितीला आणखी बळ मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार बीजिंग इन्स्टिट्यूट आॅफ बायोटेक्नॉलॉजी, सिनोव्हॅक आणि वुहान इन्स्टिट्यूट बायोलॉजिकल प्रॉडक्ट या चीनमधील कंपन्यांनी मानवी चाचणीस सुरुवात केली आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी आॅफ आॅक्सफर्ड, अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्सची मॉडर्नाएनआयएआयडी व इनोव्हिओ फार्मास्युटीकल्स या संस्था लशींची मानवी चाचणी घेत आहेत. प्री क्लिनिकल ट्रायलमधे भारतामधील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटचादेखील सामावेश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. जपानचे ओसाका विद्यापीठ व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इन्फेक्शिअस डिसीज, थायलंडची बायोनेट एशिया, बेल्जियमची जानसीन फार्मा., अमेरिकेतील व्हॅक्सआर्ट, स्पेनमधील सेंट्रो नॅसिओनल बायोटेक्नोलॉजिया, कॅनडाची आयएमव्ही, जर्मन सेंटर फॉर इन्फेक्शन रीसर्च, युनिव्हर्सिटी आॅफ हाँगकाँग, आॅस्ट्रेलियातील डोहेर्टी विद्यापीठ अशा विविध संशोधन संस्था, विद्यापीठे आणि औषध कंपन्यांचे संशोधक लस निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
>कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरात ३०० ठिकाणी प्रयोग सुरू आहेत. विषाणूवर लस तयार करताना तीन पातळींवर प्रयोग केले जातात. पहिल्या टप्प्यामधे प्रयोगशाळेत विशिष्ट औषधाचा काय परिणाम होतो ते तपासले जाते. दुसऱ्या टप्प्यात प्राण्यांवर काय परिणाम होतात, हे तपासतात. तर, तिसºया टप्प्यात मानवी चाचणी केली जाते. नव्या लशीची निरोगी व्यक्तीवर चाचणी केली जाते. लस दिल्यानंतर संबंधित विषाणूविरोधात प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार होतो ना, त्याच्या हृदय आणि किडनीवर काही परिणाम होत नाही ना, हेदेखील तपासले जाते. अनेकदा अत्यवस्थ रुग्णांवरदेखील नव्या लशीचा प्रयोग केला जातो.
- डॉ. अविनाश भोंडवे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र