Coronavirus : कोरोनाच्या धसक्यामुळे इव्हेंट कंपन्यांचे करोडो रुपयांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 12:09 PM2020-03-14T12:09:20+5:302020-03-14T12:13:41+5:30
मार्च ते मे हा इव्हेंटसाठी असतो सुगीचा काळ
नम्रता फडणीस-
पुणे : पुण्यात कोरोनाने प्रवेश केल्याच्या धसक्यामुळे मार्च ते मे या तीन महिन्यांत होणाºया सर्व इव्हेंटवर संक्रांत ओढवली आहे. काही मोठे इव्हेंट पुढे ढकलले असून, छोटे-छोटे इव्हेंट रद्द केले आहेत. याचा इव्हेंट इंड्रस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. कोरोनामुळे इव्हेंट इंड्रस्ट्री जवळपास ठप्प झाल्यामुळे करोडो रुपयांच्या नुकसानाची झळ या व्यवसायाला बसणार आहे. यातच विविध इव्हेंटमध्ये साऊंड, लाईटची सेवा देणाºया कलाकारांच्या उत्पन्नावरही गदा आली आहे.
मार्च ते मे हा इव्हेंटसाठी सुगीचा काळ असतो. मुलांच्या शाळांना लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे या तीन महिन्यांत अनेक मोठ्या आणि छोट्या कार्यक्रमांचे आयोजन इव्हेंट कंपन्यांमार्फत करण्यात येते. यासाठी एक ते दोन महिने अगोदर इव्हेंटचे नियोजन करण्यात येते. यंदाही पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांबरोबरच देशाबाहेरही अनेक नामवंत मंडळींबरोबर काही सांगीतिक कार्यक्रम, कार्निव्हल अशा इव्हेंटचे आयोजन इव्हेंट कंपन्यांनी केले होते. मात्र जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केल्यामुळे अनेक संयोजकांनी आपले कार्यक्रम पुढे ढकलले, तर काही कार्यक्रम रद्द केले आहेत. याचा सर्वांत मोठा फटका इव्हेंट कंपन्यांसह पडद्यामागील कलाकारांना बसला आहे. छोटा पँपर इव्हेंट २ लाख रुपये आणि मोठा इव्हेंटसाठी २ ते ४ कोटी रुपये इव्हेंट कंपन्यांना मिळतात. होळीपासून इव्हेंटला सुरुवात होते. मात्र कोरोनामुळे आता इव्हेंट कंपन्यांना करोडो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. तर साऊंड, लाईट, निवेदक यांनाही घरी बसण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात इव्हेंट कंपन्यांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनीही याला दुजोरा दिला आहे.
........
मार्च ते मेदरम्यान आमचे पुण्यासह महाराष्ट्राबाहेर मोठे इव्हेंट होणार होते. मात्र, त्यातील काही इव्हेंटस रद्द केले आहेत. एप्रिलपर्यंत कोणताही इव्हेंट करायचा नाही, अशी सूचना प्रशासनाकडून आली आहे. मार्च आणि एप्रिल हे दोन महिने गेल्यानंतर केवळ मे महिना उरतो. मात्र मे महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात होते. त्यामुळे बाहेरगावी कार्यक्रम करणे शक्य होत नाही. कार्यक्रमांचे मार्केट खुले व्हायला मग आॅक्टोबर महिना उजाडतो. काही कॉर्पोरेट कंपन्याही छोटे-मोठे इव्हेंट करीत असतात; मात्र आता कॉर्पोरेट कंपन्यांनीही कर्मचाºयांना घरून काम करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नुकसान तर होणारच आहे. - भूषण गुजराथी, मोल्ड मीडिया.
...............
कोरोनाच्या धास्तीमुळे काही इव्हेंट रद्द, तर काही पुढे ढकलले जात आहेत. होळीपासून इव्हेंटला सुरुवात होते. मात्र माझे ४ इव्हेंट रद्द झाले. कोरोनामुळे केवळ तीन महिनेच नव्हे तर त्यानंतर पावसाचा सिझन असल्याने जवळपास सहा महिने आता स्लॅक राहाणार आहे. त्यामुळे हा सहा महिन्यांचा काळ क्रेडिट पैशावरच काढावा लागणार आहे.- भूषण वानखेडे, इव्हेंट इन्वेंट प्रा. लिमिटेड.
........
मार्च ते मेदरम्यान कॉर्पोरेट कंपन्यांबरोबर अनेक कार्यक्रम फायनल केले होते. पण त्यातील काही पुढे ढकलण्यात आले आहेत, तर काही रद्द केले आहेत. त्यामुळे हाताला काम नसणार अशी स्थिती होण्याची शक्यता आहे. - रितेश अग्रवाल, पिक्सेल लेड मीडिया.
.........
कोरोनाची परिस्थिती सुधारण्यापर्यंत सर्व घटनांना स्थगिती देण्यात आली आहे. तसेच ३१ मार्चपर्यंत सिनेमा हॉल बंद राहतील. आम्ही सीझन मॉलला हायड्रोजन पेरोक्साईड वापरून दररोज स्वच्छ करतो. डब्ल्यूएचओ आणि भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांचा विचार करून सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. कोरोनाचा परिणाम अजून मॉलवर अद्यापपर्यंत जाणवला नाही. कारण लोकांना मूलभूत गरजांसाठी वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत आणि सीझन मॉल खरेदीसाठी संपूर्ण सुरक्षा सुनिश्चित करते.- अजय मल्होत्रा, जनरल मॅनेजर, सिझन मॉल