coronavirus : पुण्यातील प्रसिद्ध हाॅटेल्स झाली बंद ; रस्त्यांवर शुकशुकाट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 03:22 PM2020-03-18T15:22:47+5:302020-03-18T15:25:34+5:30
काेराेनाच्या पार्श्वभूमिवर पुण्यातील हाॅटेल व्यावसायिकांनी तीन दिवस हाॅटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : काेराेनाचा प्रसार वाढू नये यासाठी पुणेकरांनी कंबर कसली आहे. याआधीच पुण्यातील सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. तसेच बहुतांश आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. आता काेराेनाला राेखण्यासाठी पुण्यातील हाॅटेल व्यावसायिकांनी देखील पुढाकार घेतला असून तीन दिवस हाॅटेल्स आणि बार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे.
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी पुण्यातील व्यापारी महासंघाने तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये 40 हजारांहून अधिक व्यावसायिकांनी सहभाग घेतला आहे. त्यापाठाेपाठ पुण्याचे पाेलीस आयुक्त डाॅ. के. व्यंकटेशम यांनी हाॅटेल व्यासायिकांसाेबत घेतलेल्या बैठकीत तीन दिवस शहरातील हाॅटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज नेहमी गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते शांत झाले हाेते.
शहरातील वर्दळीचा असणारा एफसी रस्त्यावर शुकशुकाट हाेता. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांखेरीज इतर वर्दळ नव्हती. पुणेकरांची आवडती रुपाली, वैशाली, वाडेश्वर, गुडलक ही हाॅटेल्स बंद हाेती. फुटपाथवर क्वचितच काेणी दिसत हाेते. बसेस देखील रिकाम्या धावतानाचे चित्र हाेते. दुपारी बारानंतर वाहनांच्या संख्येत देखील कमालीची घट झाली.
दरम्यान ज्यांची खाण्याची कुठलिही साेय नाही, जे नागरिक जेवणासाठी हाॅटेल्सवर अवलंबून आहे, त्यांची मात्र माेठ्याप्रमाणावर गैरसाेय झाली. अनेकांना चहा मिळण्यास देखील अडचणी आल्या.