Corona in Pune: कोरोनाबाधित कुटुंबासोबत दुबईला गेलेले प्रवासी हैराण; नावं-पत्ते व्हायरल झाल्याने मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 04:19 PM2020-03-11T16:19:49+5:302020-03-11T16:24:12+5:30
सकाळपासून हजारो फोन : सोशल मीडियावर बदनामी होत असल्याने नाराजी
पुणे : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या दांपत्यासह दुबई ते पुणे विमान प्रवास केलेल्या सहप्रवाशांची यादी पुणे विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केली. ही यादी सर्व सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. त्यामळे या प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे मात्र ताथवडे-पुनावळेतील तीन प्रवाशांकडे प्रत्यक्षात जाऊन पोहचले. तेव्हा यातील एकालाही कोरोनाची लागण झाली नसून हे तिघेही सुखरूप घरी असल्याचे वास्तव समोर आले आहे. मात्र डॉक्टरांनी त्यांना कुठेही न जाण्याचा सल्ला दिल्याचेही त्यांनी सांगितले.
ताथवडे येथील या कुटुंबापर्यंत पोहचले तेव्हा त्यांनी सांगितले प्रतिबंधात्मक व केवळ प्राथमिक तपासणीसाठी आम्हाला पुण्यातील नायडू रुग्णालयात जावे लागले. मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी आम्हाला घरी सोडले. मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मॅसेजमुळे गैरसमज पसरत असून आम्हांला सकाळपासून हजारो फोन येत आहेत लोकांनी आम्हाला तुम्ही पॉझिटिव्ह आहात का निगेटिव्ह? लक्षणे काय? अशा विविध उलट सुलट प्रश्नांनी भांडावून सोडले आहे त्यामुळे फोन बंद करावा लागत आहे.कृपया आधीच खूप बदनामी झाली आहे आम्हाला फोन करून त्रास देऊ नये अशी विंनती या तिघांनी लोकमतद्वारे केली आहे