Coronavirus : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयुध निर्माण कारखान्यातील कर्मचाऱ्यांना सुटी द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 04:50 PM2020-03-21T16:50:55+5:302020-03-21T16:52:31+5:30

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे.

Coronavirus : Give leave to the workers of the armament factory | Coronavirus : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयुध निर्माण कारखान्यातील कर्मचाऱ्यांना सुटी द्या

Coronavirus : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयुध निर्माण कारखान्यातील कर्मचाऱ्यांना सुटी द्या

googlenewsNext
ठळक मुद्देसंरक्षण उत्पादन विभागाच्या सचिवांना दिले पत्र

पुणे : कोरोना विषाणूच्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त करीत संरक्षण व औद्योगिक कर्मचाऱ्यांच्या तीन प्रमुख संघटनांनी आयुध व दारूगोळा कारखान्यांमधील आयुध निर्माणाचे काम एका ठराविक काळासाठी बंद ठेवावे, अशी मागणी संरक्षण मंत्रालयाकडे केली आहे. पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहे. याच भागात आयुध निर्माण उद्योग असल्याने या आस्थापनांमधील कामगारांना प्रामुख्याने सुटी देण्यात यावी, अशीही मागणी संघटनांनी केली आहे.  
देशात कोरोना कोव्हीड-१९ च्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम १४४/१ लागू केले आहे. यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारने सरकारी कार्यालयातील ब आणि क गटातील ५० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयांमधून आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले. तसेच अनेकांना गर्दीच्या ठिकाणी सभा समारंभ या ठिकाणी न जाण्याचे आदेशही दिले आहे. राज्यात तसेच देशात याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. परंतु संरक्षण औद्योगिक कर्मचाऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे. या कारखान्यात मोठ्या प्रमाणात कामगार आहेत. शासनाच्या आदेशानुसार एका ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी या कारखान्यातील कामेही ३१ मार्चपर्यंत थांबविण्यात यावीत, अशी मागणी संघटनांनी केली आहे. यासोबतच यावर्षीच्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
बीएमपीएस संघटनेचे सरचिटणीस मुकेश सिंह म्हणाले, की यासंदर्भात आम्ही संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव यांना पत्र दिले आहे. संरक्षण साहित्य उत्पादन उद्योगातील कामगार आधीच धोक्याच्या परिस्थितीत काम करीत असतात. एकत्र काम करीत असताना कोव्हीड-१९ या रोगाची लागण  वेगाने या कर्मचाऱ्यांना होऊ शकते. या उद्योगात आसपासच्या गावातील कर्मचारी प्रवास करून येत असतात. यादरम्यानही त्यांना कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाकडे ३१ तारखेपर्यंत आयुध निर्माण कारखाने बंद ठेवण्याची मागणी आम्ही केली आहे. 
भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संजय मेनकुडाळे  म्हणाले, की पुण्यात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याच परिसरात आयुध निर्माण करणाऱ्या तीन मोठ्या कंपन्या आहेत. यात जवळपास १० हजार कर्मचारी काम करतात. यामुळे या परिसरातील रुग्णांची संख्या लक्षात घेता या कारखान्यातील कामगारांना ३१ मार्चपर्यंत सुटी देण्यात यावी, अशी मागणी आम्ही केली आहे.   

Web Title: Coronavirus : Give leave to the workers of the armament factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.