Coronavirus : 'त्यांनी' सांगितले परभणी आणि 'यांनी' ऐकले जर्मनी अन् झाला ना भाऊ गोंधळ...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:30 PM2020-03-21T15:30:09+5:302020-03-21T15:42:34+5:30
ज्यावेळी ‘ध’चा ‘म’ होतो आणि त्यानंतर कशी फजिती होते हे वेगळे सांगायला नको..
शीतल मुंडे -
पिंपरी : प्रत्येकाच्या मनात सध्या कोरोना या महाभयंकर संकटाबद्दल प्रचंड धाकधूक आहे. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत कोरोनाने सगळयांचं आयुष्य व्यापलेलं आहे. परदेशातून येणाऱ्या माणसांची प्रशासन आणि आरोग्य विभाग, सोसायट्या, नातेवाईक यांनी धास्ती घेत विविध पावले उचलली आहे. कोरोनाच्या याच दहशतीचा फटका प च्या ऐवजी ज ऐकल्यामुळे आकुर्डी खंडोबामाळ येथील 'ऐश्वर्यम ' सोसायटीमधील रहिवाशांना बसला.
त्याचे झाले असे की, मंगळवारी सोसायटीमधील एका रहिवाशाने सुरक्षारक्षकाला सांगितले की, आमच्याकडे उद्या परभणीवरून नातेवाईक येणार आहेत. त्यांना सोसायटीच्या आतमध्ये सोडा. मात्र, त्याने परभणीऐवजी जर्मनी ऐकले. आणि सुरू झाला गोंधळ.
‘सी’ विंगमध्ये जर्मनीवरून काही पाहुणे येणार आहेत. ही बातमी सोसायटीमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांची झोपच उडाली अन् संबंधित नातेवाइकाला सोसायटीत प्रवेश करू न देण्याचा चंग सोसायटीधारकांनी बांधला. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांमुळे कोरोनाची लागण होते, याचा धसका पिंपरी-चिंचवडकरांनी घेतला आहे. त्यामुळे जर्मनीवरून काही नातेवाईक आपल्या सोसायटीमध्ये येणार असल्याची चर्चा मंगळवारी सुरू झाली. त्यानंतर बुधवारी सोसायटीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी नगरसेवक, अधिकारी व विविध हेल्पलाइन क्रमांकांवर वारंवार फोन करून माहिती दिली.
सोसायटीमधील रहिवाशी तर नगरसेवकांकडे जाऊन या लोकांना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये. यासाठी प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी जर्मनीवरून येणारे पाहुणे सोसायटीमध्ये आले आहेत, हे समजल्यावर सोसायटीमधील इतर सदस्यांनी त्या रहिवाशांचे घर गाठले आणि त्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. कोरोनाची लागण सर्वत्र होत असताना तुम्ही जर्मनीवरून पाहुण्याला कशासाठी बोलविले. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग झाला तर जबाबदार कोण, तुम्ही नातेवाइकांना हॉस्पिटलला दाखल करा; अन्यथा पोलिसांकडे तक्रार करू, अशा विविध प्रश्नांचा भडीमार सोसायटीधारकांनी संबंधित सभासदावर केला होता.
.........
नातेवाईक आलेल्या सभासदांचे कोणीही ऐकण्यास तयार होईनात. अहो, दोन मिनिटे ऐका, अशी विनवणी त्यांनी हात जोडून केली. आणि म्हणाले, ‘‘आमचे नातेवाईक हे ‘ज’र्मनीवरून आलेले नसून ‘प’रभणीवरून आले आहेत.’’ हे सांगताना मात्र सोसायटीतील रहिवाशी असलेल्या सभासदाला नाकी नऊ आले. शेवटी जगात जर्मनी व भारतात परभणी याचा अनुभव आला, असे सोसायटीच्या रहिवासी व नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी दिली