Coronavirus : वापरलेल्या ‘मास्क’ची अशी लावा विल्हेवाट!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:14 AM2020-03-17T05:14:14+5:302020-03-17T05:18:48+5:30
कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, तपासणी अहवाल प्रलंबित असलेले रुग्ण, रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि डॉक्टर, नर्स, रुग्णालयांमधील कर्मचारी अशा चारच प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायचे आहेत
- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : कोरोनाच्या धसक्यामुळे बहुतांश नागरिक मास्कचा वापर करत आहेत. मात्र, मास्कची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत संभ्रम आहे. नागरिकांनी मास्क वेगळ्या पिशवीत बांधून ती सुक्या कचऱ्यासोबत जमा करावीत किंवा सर्जिकल मास्क जवळच्या रुग्णालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, ‘कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण, तपासणी अहवाल प्रलंबित असलेले रुग्ण, रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईक आणि डॉक्टर, नर्स, रुग्णालयांमधील कर्मचारी अशा चारच प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायचे आहेत. त्यांच्यासाठी एन-९५ प्रकारचे मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सामान्यांनी सरसकट मास्क वापरण्याची गरज नाही.’
हात केव्हा धुवावेत?
जेवणापूर्वी
मुलांना भरवण्यापूर्वी, अगदी स्तनपान देण्यापूर्वीही
जेवण बनवण्यापूर्वी आणि बनवून झाल्यानंतर
शौचास जाऊन आल्यावर
डायपर बदलल्यानंतर आणि मुलांना टॉयलेटला नेऊन आणल्यानंतर
नाक शिंकरल्यानंतर, खोकल्यानंतर किंवा शिंकल्यानंतर
रुग्णाला भेटायला जाण्यापूर्वी आणि त्याला भेटून आल्यानंतर
दुसऱ्यांनी वापरलेल्या खेळण्यांशी खेळल्यानंतर
प्राण्यांना हाताळल्यानंतर तसंच त्यांची विष्ठा काढल्यानंतर
तोंड, नाक, डोळे आणि कान यांच्यामार्फतच आपल्याला इन्फेक्शन्स होत असतात. म्हणून चेहºयाला वारंवार हात लावणे टाळले पाहिजे. शिंकताना किंवा खोकताना तोंड झाका.
मास्क कसा वापरावा?
मास्कच्या पुढील भागाला हात लावू नये.
कानामध्ये अडकवण्याच्या दोरीलाच हात लावून मास्क घालावा किंवा काढावा.
नाक आणि तोंड पूर्ण झाकले जाईल, असा मास्क असावा.
मास्क सैल असू नये, तो तोंडावर फिट बसावा.
मास्क घालण्याआधी
आणि घातल्यानंतर हात साबणाने किंवा हँडवॉशने स्वच्छ धुवावेत.
आपले हात ठेवावे सतत स्वच्छ...
निरोगी राहण्याची गुरुकिल्ली ही आपल्या हातातच आहे.
आपल्या अस्वच्छ हातांमध्ये इतके जिवाणू आणि विषाणू असतात, जे आपल्याला सुदृढ राहण्यासाठी मदत करतात
केवळ वीस सेकंद साबण/लिक्विड हॅण्ड वॉशने हात धुतल्यास जंतू मरतात.
नख आणि तळहातदेखील स्वच्छ करा. त्यामुळे, प्रत्यक्षात हातावरुन जे काही विषाणू आहेत ते मरुन जातात.
या आहेत महत्त्वाच्या टिप्स
सर्जिकल मास्क एकदाच वापरायचा असतो. त्यामुळे तो काढल्यावर लगेचच वेगळ्या पिशवीत (बायोडिग्रिडेबल) बांधून मग सुक्या कचऱ्यात टाकावा.
सामान्य नागरिकांनी एन-९५ मास्क वापरण्याची गरज नाही.
सर्जिकल मास्क एकावर एक असे दुहेरी लावावेत.
कापडी मास्क असतील, तर ते गरम पाण्यात १०-१५ मिनिटे भिजत ठेवावेत. गरम पाण्यात डेटॉल किंवा तत्सम जंतुनाशक मिसळावे. दहा मिनिटांनी मास्क साबणाने स्वच्छ धुवावा आणि कडक उन्हात वाळत्ो घालावा.
कापडी मास्क घरातील इतर कपड्यांबरोबर धुवायला टाकू नयेत.