coronavirus : पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ ; बाधितांचा आकडा पाचवर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 06:33 PM2020-03-10T18:33:35+5:302020-03-10T18:35:47+5:30
सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याशी संबंधित आणखी दोन आणि इतर एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते आहे. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक दुबईला एका फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नागरिक विविध जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला संपर्क करुन तपासणी करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
पुणे : ,पुण्यात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची दिसून येत असून सोमवारी दोनवर असणारी बाधितांची संख्या आता पाचवर पोचल्याचे समजते आहे. सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या दाम्पत्याशी संबंधित आणखी दोन आणि इतर एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव होताना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, साेमवारी रात्री पुण्यातील एका दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. हे दाेघेही फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दुबई येथे फिरण्यास गेले हाेते. एक मार्च राेजी ते भारतात परतले. या दाेघांपैकी महिलेला त्रास झाल्याने त्यांनी काेराेनाबाबतची तपासणी करुन घेतली. यावेळी त्या महिलेला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले. त्या महिलेच्या पतीचीसुद्धा तपासणी करण्यात आली त्या रिपोर्ट्सनुसार त्यांनाही लागण झाल्याचे समजते आहे. या दांपत्यासाेबत 40 अन्य पर्यटक दुबईला एका फिरण्यास गेले हाेते. या 40 लाेकांची नावे आणि संपर्क क्रमांक प्रशासनाकडे उपलब्ध असून हे नागरिक विविध जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे संबंधित जिल्हा प्रशासनाला संपर्क करुन तपासणी करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले आहे.
पुण्यात संबंधित कोरोनाग्रस्त दाम्पत्याच्या मुलीला आणि त्यांना मुंबईहून पुण्यापर्यंत घेऊन आलेल्या ओला ड्रायव्हरलाही कोरोना झाल्याचे समजते आहे. याशिवाय आणखीही एका व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. याबाबत प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी रात्री आज दिवसभराच्या घडामोडींची माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४५वर पोचली आहे.