coronavirus : नागरिकांशी साैजन्याने वागण्याच्या पाेलिसांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 08:40 PM2020-03-26T20:40:49+5:302020-03-26T20:41:43+5:30
कर्फ्युच्या काळात रस्त्यावरुन फिरणाऱ्या नागरिकांना पाेलिसांनी काठ्यांचा प्रसाद दिल्याने सर्वत्र राेष व्यक्त करण्यात येत हाेता.
पुणे : लॉक डाऊनच्या काळात संचारबंदीमध्ये विनाकारण फिरणार्यांना सक्तीने घरी बसविण्यासाठी पोलिसांनी आपल्याकडील लाठीचा जोरदार वापर केला. त्यावर चाहूबाजूने टिका होऊ लागल्याने पोलिसांना सौजन्याने वागण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लॉक डाऊनची घोषणा झाल्यानंतर मंगळवारी व बुधवारी लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येत होते. व्हॅनमधून पोलीस लोकांना घरी जाण्याचे आवाहन करत असतानाही लोक त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे पोलिसांनी दुचाकीवरुन जाणार्या तरुणांना काठ्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली.राज्यभरातील ही परिस्थिती पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांनी त्यांच्या काठ्यांना तेल लावून ठेवावे असे वक्तव्य केले. त्यामुळे पोलिसांना मोकळे रान मिळाले. राज्यभरात पोलीस दिसेल त्याला झोडपून काढू लागले. काही पोलिसांची मजल त्याही पुढे गेले़ त्यांनी लोकांना आपण कसे मारतो, हे दाखविणार्या व्हिडिओ काढून ते टिकटॉकवर टाकण्यास सुरुवात केली.
पोलीस दुपारी, रात्री गल्लीबोळातून जात असलेल्यांना दंगलखोर असल्याप्रमाणे वागणूक देत मोटारसायकलवरुन येऊन मारहाण करु लागले. नागरिकांचा रोष वाढू लागल्याचे पाहून वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना त्याची दखल घ्यावी लागली. त्यामुळे पोलिसांना सौजन्यांने वागण्याच्या सूचना देण्यात आला. शहरातील रस्त्यांवर आता कोठेही नाकाबंदी न करता चौकातील सीसीटीव्हीच्या कक्षेतच नाकाबंदी करण्याचे आदेश दिले आहेत.
नागरिकांना मारहाण होणार नाही, याकडे सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांनी स्वत: गस्त घालून लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून रस्त्यावरील पोलिसांच्या वागणूकीत बदल झाल्याचे दिसून आला आहे. अनेक ठिकाणी पोलीस गाडीवरुन आलेल्यांना हात जोडून विनंती करीत असल्याचे दृश्य दिसू लागले आहे.