Coronavirus : हातांची स्वच्छता ठेवा खास, कोरोना आता बास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 12:41 PM2020-03-16T12:41:14+5:302020-03-16T12:52:25+5:30

योग्य काळजी घेतल्यास आजार राहील दूर

Coronavirus : Keep your hands clean, keep away from a Corona | Coronavirus : हातांची स्वच्छता ठेवा खास, कोरोना आता बास

Coronavirus : हातांची स्वच्छता ठेवा खास, कोरोना आता बास

googlenewsNext
ठळक मुद्देसॅनिटायझर अत्यावश्यक नाहीच, साबण पुरेसे 

श्रीकिशन काळे - 

पुणे : सध्या कोरोनाचा कहर झाला असून, पुण्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने सुरक्षितपणे काळजी घेतली, तर या कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण हात व्यवस्थित स्वच्छ केले तर हा आजार होणारच नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुतले तरी चालणार आहेत. त्यासाठी महागडे सॅनिटायझर घेण्याची काहीच गरज नाही. 
..........
हात स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक सॅनिटायझर विकत घेण्यावर भर देत आहेत. कारण त्यामुळे हात स्वच्छ ठेवले जातात. परंतु, केवळ साबणाने हात स्वच्छ आणि योग्य प्रकारे धुतले तर कोरोनापासून दूर राहता येते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे विनाकारण महागडे सॅनिटायझर घेण्याची गरज नाही. हात स्वच्छ ठेवणे 
आवश्यक आहे. कारण कोरोनाबाधितद्वारे कोरोना विषाणू कुठेही लागू शकतो. आपण हात कुठेही ठेवतो आणि हाताला तो विषाणू लागून आपल्याला त्याची बाधा होऊ शकते. म्हणून हातांची योग्य स्वच्छता करावी, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.  
............


वाहत्या पाण्याने हात ओले करावेत. 
पुरेसे साबण हातावर घ्यावा. 
हाताला मागून-पुढून व बोटांच्या मधल्या भागात कमीतकमी २० सेकंद चोळावे. 
स्वच्छ पाण्याने हात व्यवस्थित धुवावेत. 
स्वच्छ टॉवेलने हात कोरडे करावेत.हात केव्हा-केव्हा धुवावेत ? 

शिंक किंवा खोकला आल्यावर आणि नाक शिंकरल्यावर. 
सार्वजनिक ठिकाणी जाऊन आल्यानंतर. 
आजारी व्यक्तींना भेटण्याआधी व भेटल्यानंतर. 
खाण्यापूर्वी व जेवणापूर्वी व जेवणानंतर.
टॉयलेटचा वापर केल्यानंतर.
पाळीव प्राण्यांना हाताळल्यावर. 
लहान मुलांना हात धुण्याची सहज सवय होईल, अशी व्यवस्था करून द्यावी.
..................

कोरोनासंबंधी कोणतीही माहिती सोशल मीडियावर फिरवून घबराट निर्माण करू नका.कोरोना हा बरा होणारा रोग आहे, यावर विश्वास ठेवून स्वत:बरोबर समाजातीलरोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करा.आरोग्य विभागाच्या राज्य नियंत्रण कक्षाकडून अधिकृत माहिती घ्या.टोल फ्री क्रमांक104 आणि 020 26127394 वर माहिती मिळेल.

‘कोविड-१९’ या विषाणूला एक मेद आवरण असते. ज्यामुळे तो इन्फेक्शन करू शकतो. साबणाने हात धुण्यामुळे हे मेद आवरण विरघळण्यास मदत होते. ज्यामुळे हा विषाणू इन्फेक्शन करत नाही. म्हणून वारंवार साबणाने हात धुणे हे  प्रभावी शस्त्र आहे, असे डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले. 

..........
वारंवार हात धुणे का आवश्यक आहे?
‘कोविड-१९’ या विषणूचा प्रसार, विषाणूबाधित रुग्णांच्या शिंकेतून अथवा खोकल्यातून तर होतोच पण या शिवाय रुग्णांच्या शिंकेतून वा खोकल्यातून बाहेर पडलेले  विषाणू या रुग्णाच्या आजूबाजूच्या वस्तूंवर किंवा त्याने हाताळलेल्या वस्तूंवर पडून तिथे साधारणपणे ९ दिवस जिवंत राहू शकतात आणि या वस्तू इतर व्यक्तींनी हाताळून स्वत:च्या नाकाला वा चेहºयाला हात लावला तर त्यांनाही या विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो. म्हणून वारंवार हात धुण्याची सवय  लावून घेणे आवश्यक आहे. डॉ. राजेश कार्यकर्ते, विभाग प्रमुख, सूक्ष्मजीवशास्त्र, ससून रुग्णालय.
.........
२० सेकंद हात घासावेत............. 
हात धुण्यास पाणी व साबण नसल्यास ६० टक्के अल्कोहोल असलेल्या हॅन्ड सॅनिटायझरने २० सेकंद हात एकमेकांवर घासावेत जेणेकरून हाताच्या प्रत्येक भागापर्यंत सॅनिटायझर पोहोचेल. सॅनिटायझर नसेल तर साबण उत्तमप्रकारे काम करते. त्यामुळे सॅनिटायझरच हवे असा आग्रह धरू नये. - डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय .
.......
लहान मुलांची काळजी............
बदलणारे हवामान, बदलेलेली जीवनशैली, चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहार आणि व्यायामाचा अभाव या कारणांनी प्रतिकारक्षमतेवर परिणाम होऊन सर्दी, खोकला, ताप, पोट बिघडणे, अशा कितीतरी आजारांना तोंड द्यावे लागते. कोरोना व्हायरसमुळे सध्या अशाच स्वरूपाची लक्षणे दिसून येत आहेत. वाहती सर्दी, घसादुखी, कफ, खोकला, ताप अशा स्वरूपाची लक्षणे यात दिसून येतात. लहान मुलांमध्ये प्रतिकारक्षमता मुळात कमी असते. मोठ्या व्यक्ती, वृद्ध यांनी तर काळजी घ्यायचीच; पण लहान मुलांचे वय, खेळकर वृत्ती, क्लासेसच्या निमित्ताने जाणे-येणे यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक असते. लहान मुले हात कुठेही लावत असतात म्हणून त्यांची दक्षता घ्यावी. 
.............
घसा दुखत असेल, तर करा हे उपाय.. 
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्दी, ताप, खोकला लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरित औषधी योजना सुरू करावी. अत्यंत सोपा सहज उपाय म्हणजे लगेच गरम पाणी पिण्यास द्यावे. घसा दुखत असेल तर आराम पडतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात. तुळशीची ४-५ पाने स्वच्छ धुवून घेऊन ग्लासभर पाण्यात घालावीत. गवती चहा, दालचिनीचा छोटा तुकडा घालून ते पाणी उकळावे. गरम स्वरूपात पिण्यास द्यावे. आल्याचा रस आणि मध हे चाटण २-३ वेळा दिल्यास कफ कमी होण्यास मदत होते. सिनीपलारी पर्ण १/२ चमचा आणि ज्येष्ठमध १/४ चमचा एकत्र करून मधासह चाटण दिल्यास घशाला आराम मिळतो.
............


सर्दी, खोकला कमी होण्यासाठी........... 
पिंपळी पावडर, ज्येष्ठमध, पावडर, सितोपलादी चूर्ण (सर्व १/२ चमचा) एकत्र करून गरम पाण्याबरोबर किंवा मधासह एकत्र करून दिल्यास सर्दीसाठी चांगला उपयोग होतो. सर्दीची सुरुवात असल्यास त्वरित दिले तर सर्दी वाढत नाही. लवंग भाजून चघळल्यास खोकला कमी होतो. मुलांना खडीसाखर आणि लवंग चघळण्यास द्यावी.
........
ताप, अंगदुखीवर काय करावे ? 
पारिजातकाची पाने मिळाल्यास २/३ पाने स्वच्छ धुवून २ कप पाण्यात घालून उकळून ते पाणी सेवन केल्यास ताप कमी होतो. पाने न मिळाल्यास पारिजातक वटी, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मात्रा ठरवून घ्यावी. अंगदुखी, तापाला आराम मिळतो. लक्षणे वाढली तर डॉक्टरांकडे त्वरित जा.  
............
कोरोनासाठी पथ्य पाळा
कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही. पण आवश्यक काळजी घेणे जरूरीचे आहे. जेवणाआधी, बाहेरून जाऊन आल्यावर वस्तूंना हाताळल्यानंतर, खेळणी खेळल्यानंतर मुलांनी साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. शाळेतही डबा खाण्यापूर्वी कंटाळा न करता हात धुणे आवश्यक आहे. सर्दी, शिंका, खोकला यामध्ये तोंडावर रुमाल ठेवून क्रिया करण्याची सवय मुलांना लावणे आवश्यक आहे. तो रुमाल वेगळा ठेवावा. दुसºया दिवशी धुवून टाकावा. कोणतीही वस्तू लहान मुले तोंडात  घालू पाहातात. याकडे लक्ष ठेवावे. मुलांचे कपडे, डबा या गोष्टी स्वच्छ राहतील याची दक्षता घ्यावी. थुंकणे, खूप जवळ जाऊन बोलणे, शिंकणे या गोष्टी टाळल्या जातील हे पालकांनी पाहावे. बाहेर जाताना महागड्या मास्कऐवजी साधा रुमाल बांधला तरी चालतो.     
- डॉ. विनिता कुलकर्णी, आयुर्वेदतज्ज्ञ.


 

Web Title: Coronavirus : Keep your hands clean, keep away from a Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.