CoronaVirus Live Updates : 'ऑक्सिजन'ची मागणी आली निम्म्यावर, पुरवठा वाढला; रुग्ण झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 10:00 PM2021-05-23T22:00:12+5:302021-05-23T22:02:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना काळात २५० मेट्रिक टनांपर्यंत मागणी वाढलेल्या ऑक्सिजनची मागणी आता निम्म्यावर आल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले.
पुणे - शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली असतानाच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. एप्रिल महिन्यात ऑक्सिजनच्या मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागले. परंतु, मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या घटत गेल्याने ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वाढला आणि मागणी ५० टक्क्यांवर आली आहे. कोरोना काळात २५० मेट्रिक टनांपर्यंत मागणी वाढलेल्या ऑक्सिजनची मागणी आता निम्म्यावर आल्याचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजय वावरे यांनी सांगितले.
एप्रिल महिन्यात पालिकेला ४० टनांची मागणी होती. ही मागणी वाढून ५१ टनांवर पोचली होती. एकीकडे खाटा वाढविण्यात आल्या होत्या. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत नसल्याने दुसरीकडे चिंता वाढली होती. पालिकेची आठ कोविड रुग्णालये आहेत. नायडू रुग्णालयाला सात टन, दळवी रुग्णालयाला ९ टन, शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटरला १६ टन, बाणेर कोविड सेंटरला ११ टन, ईएसआयसी रुग्णालय बिबवेवाडीला ३ टन, खेडेकर रुग्णालयाला एक टन आणि लायगुडे रुग्णालयाला एक टन यासोबत अन्य आवश्यकता लक्षात घेता जवळपास ५० टन ऑक्सीजन लागत होता. तर खासगी रुग्णालयाला १५० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता.
ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने नोडल ऑफिसर म्हणून नियुक्त केले होते. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनीही ऑक्सिजन पुरवठ्यातील समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली होती. दरम्यान, पालिकेने आतापर्यंत तीन ऑक्सिजन प्लान्ट केले आहेत. तर, आणखी पाच प्लान्ट उभे केले जाणार आहेत. पालिकेच्या मुरलीधर लायगुडे दवाखाना, दळवी रुग्णालय, नायडू रुग्णालय आणि बाणेर जम्बो कोविड सेंटरमध्ये पहिल्या टप्प्यात प्लान्ट उभारण्यात आले आहेत. यातील, लायगुडे, दळवी आणि नायडूमधील प्लान्ट सुरू झाले आहेत. तर, बाणेर येथील प्लान्टचे काम लवकरच सुरू होणार आहे. तर, खेडेकर, बाणेर, वारजे, नायडू आणि इंदिरानगर येथील रुग्णालयांमध्येही आणखी सहा प्रकल्प प्रस्तावित आहेत.