coronavirus : पुणे पाेलिसांनी केली दीड हजार वाहने जप्त ; लाॅकडाऊनचे केले हाेते उल्लंघन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 01:26 PM2020-04-03T13:26:20+5:302020-04-03T13:30:47+5:30
विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना वारंवार नियमभंग करणाऱ्या नागरिकांची वाहने आता वाहतूक शाखेने जप्त केली आहेत.
पुणे : शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अशावेळी नागरिकांना घराबाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र तरी देखील त्या काही नागरिक, वाहनचालक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः वाहनचालक बेशिस्तपणे वागत असून ते सरकारी कामात अडथळा आणत आहेत. अशा वाहनचालकावर शहर वाहतूक विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. त्यात 1 हजार 686 वाहने जप्त वाहतूक प्रशासनाने जप्त केली आहेत.
भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एकूण 541 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर 1 हजार 655 जणांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे. शहरातील पाच परिमंडळव्दारे 406 जणांवर तर वाहतूक विभागाकडून 135 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि वाहतूक प्रशासन यांच्याकडून नागरिकांना वेळोवेळी विनंती करून देखील ते विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यासंबंधी त्यांना विचारणा केली असता बहुतांशी नागरिक व वाहनचालक हे आपण औषधे आणण्यासाठी, डॉक्टरकडे तपासणीसाठी, किराणा, भाजीपाला आण्याकरिता बाहेर पडत असल्याचे सांगत आहे. शहरात कोरोनाची स्थिती गंभीर असून त्यावर मात करण्यासाठी पोलीस, राज्य प्रशासन यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना नागरिकांनी सहकार्य करून घरातुन बाहेर पडू नये असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.