Coronavirus in Pune: इंदापूर तालुक्यात मुंबईहून गावी आलेल्या मायलेकीला कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2020 11:10 AM2020-05-17T11:10:01+5:302020-05-17T11:10:44+5:30
इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मागील आठवड्यात एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला होता. मात्र उपचार घेत असताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला.
कळस - इंदापूर तालुक्यातील शिरसोडी भागात दोन कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे .शनिवारी रात्री त्यांचे अहवाल उशीरा प्राप्त झाले हे दोन्ही रुग्ण एकाच कुटुंबातील असून यामध्ये एका महिला आई (वय ३५ वर्ष) आणि मुलगी (वय ११ वर्ष) या मायलेकीचा समावेश आहे.
मुंबई येथील कोरोना संक्रमित भागातून चार जणांचे कुटुंब गुरुवारी शिरसोडी याठिकाणी गावी आले होते. त्याची माहिती प्रशासनास मिळताच कुटुंबाचे विलगीकरण करुन त्या राहत असलेल्या घराची सोडीयम हायक्लोराईड द्रावणाने फवारणी करण्यात आली होती. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात आणून घशातील द्रावाचे नमुने घेतले. त्याचा रिपोर्ट शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाला असून चार पैकी दोघांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह, व इतर दोघांचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत.
हे रुग्ण हे मुंबईतून ज्या गाडीने आले, त्या गाडीच्या चालकाची तसेच संपर्कातील लोकांची माहिती घेण्यात येत आहे. या दोन्ही रुग्णांवर इंदापूर मध्येच उपचार केले जाणार आहेत. या रुग्णांच्या संपर्कात कोण कोण आले आहेत. याची चौकशी प्रशासन करणार असून संपर्कात आलेल्या सर्वांना स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेखा पोळ यांनी दिली.
दरम्यान , इंदापूर तालुक्यात भिगवणमध्ये मागील आठवड्यात एक कोरोना संक्रमित रूग्ण आढळला होता. मात्र उपचार घेत असताना त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर इंदापुर तालुका कोरोनामुक्त झाला होता .मात्र, आता पुन्हा दोन रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.