coronavirus : मुंबई- पुणे कम्युनिटी ट्रान्समिशनच्या दिशेने ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 05:38 PM2020-04-07T17:38:28+5:302020-04-07T17:39:25+5:30
गेल्या काही दिवसांपासून मुंबई - पुण्यातील काेराेनाच्या रुग्णांमध्ये माेठ्याप्रमाणावर वाढ हाेत आहे. त्यामुळे ही दाेन शहरे कम्युनिटी ट्रान्समिशनकडे जात असल्याचे समाेर आले आहे.
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई - पुण्यातील काेराेनाबाधित रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. मुंबईमध्ये आत्तापर्यंत 600 काेराेनाबाधित रुग्ण आढळले असून 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तर पुणे शहरात 119 रुग्णांना काेराेनाची बाधा झाली असून आठ नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. या दाेन शहरांमध्ये काेराेनाबाधितांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे या दाेन शहरांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचे मत इंडियन मेडिकल असाेसिएशनचे अध्यक्ष डाॅ. अविनाश भाेंडवे यांनी लाेकमतशी बाेलताना व्यक्त केले.
राज्यात सर्वप्रथम काेराेनाचा रुग्ण पुण्यात आढळला हाेता. त्यानंतर राज्यातील इतर शहरांमध्ये काेराेनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात हळूहळू काेराेनाबाधितांमध्ये वाढ हाेत हाेती. परंतु गेल्या एक आठवड्यापासून काेराेनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ हाेत आहे. त्यामुळे ही कम्युनिटी ट्रान्समिशनची सुरवात असून यामध्ये विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मुंबई आणि पुण्यातील काही भाग सील केले असून तेथील नागरिकांना बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
डाॅ. अविनाश भाेंडवे म्हणाले, आपण काेराेनाच्या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून काेराेनाग्रस्तांमध्ये वाढ हाेत आहे. काही ठिकाणी झाेपडपट्टीमध्ये तसेच दाट वस्तीच्या ठिकाणी राहणाऱ्या लाेकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. कुठल्याही साथीच्या राेगामध्ये जशी रुग्णांमध्ये वाढ हाेते, तशीच ही वाढ हाेत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये लागण हाेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असते तर बऱ्या हाेणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी असते. तर मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढत जाते. हा काळ कम्युनिटी ट्रान्समिशनचा असताे. मुंबई पुण्यामध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन सुरु झाल्याचे दिसत आहे. या काळात आपण जास्तीत जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडणे टाळायला हवे. त्याचबराेबर काेराेनाबाबतच्या स्वच्छतेच्या सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे.