मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 01:31 PM2020-03-29T13:31:35+5:302020-03-29T13:38:50+5:30

लाॅकडाऊनमुळे भारतीयांना घरी रहावे लागत आहे. यात काहींना मानसिक आजारांना समाेरे जाऊ लागू शकते. त्यामुळे मानसिक आराेग्याला देखील अत्यावश्यक सेवांमध्ये समाविष्ट करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

coronavirus : The need to include mental health in necessary needs : Anand Nadkarni rsg | मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी

मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करण्याची गरज : डॉ. आनंद नाडकर्णी

Next

नम्रता फडणीस

पुणे : कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं अनेक दिवसांपासून  ‘होम क्वारंटाईन’ झालेल्या व्यक्तींपुढं आता 14 एप्रिलपर्यंत करायचं काय? असा एक गहन प्रश्न निर्माण झाला आहे. या चिंतेमुळे  व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याशी ’लोकमत’प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनीही या शक्यतेला काहीसा दुजोरा दिला असून, ‘मानसिक आरोग्याला अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

‘होम क्वारंटाईन’ मुळे कोणत्या मानसिक समस्यांना सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे?
- पहिली म्हणजे  ‘चिंता’. कारण अनिश्चितता आली की चिंता येते. कुठलीही नकारात्मक भावना तिची तीव्रता, कालावधी आणि मग पुनरावुत्ती या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामुळे भावनांचा माणूस म्हणून अनुभव हा येतचं असतो. पण या तीन गोष्टींना आजार कधी म्हणायचं तर यात वुद्धधी झाली तर अनिश्चिततेमुळे चिंता आपोआप वाढते. आपल्यावरची बंधन इतकी आहेत कि आपल्या परिघातल्या गोष्टी कमी झाल्या आहेत. दुसरं या चिंतेचे पर्यावसन हे
नैराश्यात होऊ शकतं. कुठेचं काही मार्ग मिळत नाहीये. मग नैराश्य वाढू शकतं. तिसरं म्हणजे नातेसंबंधातील ताणतणाव यात भर पडू शकते. कारण शहरात लोकांना एकमेकांबरोबर राहाण्याची सवय नाहीये आणि मिळालेल्या वेळेचा विधायक उपक्रम करण्याचं टीम वर्क जर कमी पडलं तर नाते संबंधात तणाव हे पालक आणि मुलांच्या नातेसंबंधात देखील तणाव येऊ शकतात. चौथा भाग म्हणजे ज्यांना गतिमान आयुष्य जगण्याची सवय झाली आहे, त्यांना ही शांतता किंवा ही स्थितीशीलता खायला उठते. त्यातून मग चिडचिड होण्याचं प्रमाण वाढतं.या गोष्टी होणारचं. त्यात भर म्हणजे जे मानसिक रूग्ण आहेत त्यांच्या आजारातही वाढ होण्याची शक्यता आहे.

यातून मग व्यसनाधीनतेला आमंत्रण मिळू शकेल असं वाटतं का ?

- हो का नाही. घरी बसल्यामुळे जोपर्यंत तुमच्याकडं स्टॉक आहे तोपर्यंत ती चालू राहाणार. किंबहुना त्यात वाढ होणार. मग ती तंबाखू, सिगरेट आणि दारू असू देत. लोक या शिकारीसाठी नक्कीच बाहेर पडणार. त्यामुळं व्यसनाधीनतेमध्ये होणारी वाढ आणि व्यसनाधीनता सक्तीनं बंद करावी लागल्यामुळं येणारे विड्रॉल हा देखील गंभीर मानसिक आजारचं आहे. कुणाला असा विड्रॉल आला तर ही उपचारासाठीची संधी आहे असं समजून जवळच्या रूग्णालयात दाखल व्हा.

सध्याच्या स्थितीत मानसिक आजाराला कसं टाळता येईल?
- आता पालक आणि मुलांचंच उदाहरण पाहा. पालकांना मुलांना सतत घराबाहेर पिटाळण्याची सवय असते. मात्र आता मुलांना बाहेर जायला मिळत नाहीये. त्यामुळे पालकांसमोर  गहन प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पालक आणि मुलांमधील संवाद बळकट करण्याची ही चांगली संधी आहे. असं मानायला हवं. माध्यमांचाही योग्य पद्धतीनं वापर करायला हवा. वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या दिवसाचं योग्य नियोजन करा. विकास, विरंगुळ्यासाठी उपक्रम आखले पाहिजेत. स्क्रीन बंद करून एकमेकांसाठी वेळ द्यायला पाहिजे. एकत्र गाणं, पदार्थ बनविणं हे पातळीवर व्हायला हवं.

समाजाचं मानसिक स्वास्थ उत्तम राहाण्यासाठी मानसोपचार तज्ञांची यंत्रणा कशाप्रकारे कार्यान्वित आहे?
- आम्ही तीन तास ओपीडी सुरू ठेवली आहे. एवढी बंधन असूनही रोज पाच ते सहा मानसिक आजाराशी संबंधित रूग्ण येत आहेत. आम्ही व्हॉटसअप आणि आॅनलाईनद्वारे समुपदेशन सुरू केले असून, जुन्या रूग्णांना आॅनलाईन प्रिस्क्रिप्शन पाठवत आहोत. नवीन जे रूग्ण येतील त्यांच्यासाठी काय
करायचं हा प्रश्न आहे. लोक येणार कसं? मग त्यांनी जवळच्या क्लिनिक मध्ये जाणं आणि मग आम्ही संबंधित डॉक्टरला प्रिस्क्रिप्शन लिहून दे असं सांगण्याशिवाय पर्याय नाही.

शासकीय पातळीवर काय होणं आवश्यक आहे असं वाटतं?
-आता तरी मानसिक आरोग्याचा वेगळा समावेश अत्यावश्यक सेवेत करायला हवा. आधीच मानसोपचार तज्ञांची संख्या कमी आहे. तसं केलं तर सावधानी ठेवून ओपीडी सुरू ठेवता येतील. काही ठिकाणी पोलिसांनी ओळखपत्र दिले आहे. पण सर्व ठिकाणी हे नाही.एमएमसीने प्रिस्क्रिपशन आॅनलाईन देण्याला परवानगी दिली आहे. पण आमची  शेड्यूल औषधे आहेत. केमिस्ट ही औषधे देत नाहीत. मानसिक रूग्ण घराबाहेर पडला तर पोलीस त्याला हे आवश्यक आहे का? असं म्हणतील म्हणून ही वरील मागणी आहे.

Web Title: coronavirus : The need to include mental health in necessary needs : Anand Nadkarni rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.