CoronaVirus News: जूनमध्ये होईल कोरोनाचा उच्चांक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 02:18 AM2020-05-27T02:18:13+5:302020-05-27T02:18:19+5:30
राज्यातील कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे.
पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग महिनाभरापासून १४ दिवसांवर पोहचला. वाढलेल्या चाचण्या आणि लॉकडाउनची बंधने काही प्रमाणात शिथिल केल्याने रुग्णसंख्येचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रेड झोनमध्ये रुग्णसंख्या वाढत जाऊन जून महिन्याच्या मध्यास किंवा अखेरीस छच्च्उच्चांक गाठेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. जूनअखेरपर्यंत रुग्ण दुप्पट होण्याचा वेग कायम राहिल्यास शहरातील एकुण रुग्णसंख्येचा आकडा २० ते २५ हजारांवर जाईल, असा अंदाज आहे.
राज्यातील कोरोना कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली आहे. रोज नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढत आहे. जवळपास ८० टक्के रुग्ण या महानगरांमधील आहेत. सध्याचा रुग्ण दुप्पट होण्याचा वेग जवळपास १३.५ ते १४ दिवसांचा आहे. राज्यात दररोज १० ते १२ हजार चाचण्या होत आहेत. चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्याही वाढणार आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा वेग पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील १४ दिवसांत राज्यातील रुग्णांचा आकडा एक लाखांच्या पुढे जाऊ शकतो. ही साखळी जूनअखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत जाईल, असा तज्ज्ञांचा कयास आहे.
पुढील काही दिवसांत रुग्णांत वाढ
सुरूवातीच्या अंदाजाप्रमाणे कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग एक तृतीयांशने कमी आहे. तपासण्या वाढत जातात त्याप्रमाणे विषाणुच्या प्रसाराचा वेग मंदावत जातो. ‘हर्ड इम्युनिटी’ या प्रसाराला आळा घालत जाते. नंतर वेग खूप कमी होत जातो. पुढील काही दिवस नवीन रुग्ण वाढणार असून जूनच्या मध्यापर्यंत आपण उच्चांक गाठू असे वाटते,’ असे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.