CoronaVirus News : देशात संसर्ग वाढतोय, मात्र तीव्रतेत घट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 01:46 AM2020-05-19T01:46:06+5:302020-05-19T01:46:31+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : १ मे या दिवसापर्यंत देशात १ हजार २३१ मृत आणि १० हजार २१ उपचारानंतर बरे अशा एकूण ११ हजार २५२ ‘क्लोज केसेस’ आढळल्या.
- अमोल मचाले
पुणे : आपल्या देशामध्ये ‘कोविड-१९’ या रोगाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या स्थितीतही एक सकारात्मक बाब समोर आली आहे. रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी या रोगाच्या तीव्रतेत सातत्याने घट होत असल्याचे ‘क्लोज केसेस’वरून (बरे होणारे आणि मृतांची एकूण संख्या) निदर्शनास येते. याबाबत मे महिन्यातील रोजची स्थिती बघता बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे, तर मृतांचे प्रमाण कमी होत आहे. अर्थात, ही गती संथ असली तरी, त्यात सातत्य आहे.
१ मे या दिवसापर्यंत देशात १ हजार २३१ मृत आणि १० हजार २१ उपचारानंतर बरे अशा एकूण ११ हजार २५२ ‘क्लोज केसेस’ आढळल्या. टक्केवारीचा विचार करता, यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८९.०६ तर मृतांचे प्रमाण १०.९४ टक्के होते. रविवारी (दि. १७) ‘क्लोज केसेस’ची एकूण संख्या ३९ हजार ८१९ होती. यात बरे होणाºयांचे प्रमाण ९२.४१ टक्के (३६ हजार ७९५), तर मृतांचे प्रमाण ७.५९ टक्के (३ हजार २४) होते. १ ते १७ मे या काळाचा विचार करता बरे होणाºयांचे प्रमाण सातत्याने वाढत गेले, तर मृतांचे प्रमाण कमी होत गेले. केवळ ३ मे हा दिवस याला अपवाद ठरला. आधीच्या दिवशीच्या तुलनेत या दिवशी बरे होणाºयांचे सरासरी प्रमाण कमी, तर मृतांचे प्रमाण जास्त होते.
या आजारामुळे देशात पहिला मृत्यू १२ मार्चला झाला होता. त्यानंतर २० एप्रिलपर्यंत ‘क्लोज केसेस’मध्ये मृत १३.३३ ते २६.४० टक्के तर बरे होणाºयांचे प्रमाण ८६.७६ ते ७३.६० टक्के होते.
मे महिन्यात यामध्ये सुधारणा झाली.