CoronaVirus News in Pune : बारामतीत आढळला १५वा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, लोणी भापकर गाव सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 11:24 AM2020-05-25T11:24:03+5:302020-05-25T11:25:01+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : बारामतीच्या ग्रामीण भागातील हा ७ वा कोरोना बाधित रुग्ण आहे. बारामतीत एकूण संख्या आता १५वर जाऊन पोहोचली आहे.
बारामती : बारामतीत १५वा कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण ७० वर्षीय असून तो मुंबई घाटकोपर येथून १९ मे रोजी गावी आला होता. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. त्याच्यावर बारामती येथील रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.
हा रुग्ण १९ मे रोजी त्याच्या घरी आला होता. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्याची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये त्याला संसर्ग झाल्याचे आज मिळालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. बारामतीच्या ग्रामीण भागातील हा ७ वा कोरोना बाधित रुग्ण आहे. बारामतीत एकूण संख्या आता १५वर जाऊन पोहोचली आहे.
आजचा रुग्ण देखील मुंबईतून आला आहे. बारामती शहर कोरोना मुक्त करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र , बाहेरून आलेल्या नागरिकामुळे बारामतीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे, तसेच ग्रामीण भागात कोरोना पसरत असल्याने स्थानिक नागरिक अडचणीत आल्याचे दिसत आहे .
नागरीकांनी लॉकडॉऊन शिथिलतेचा गैरफायदा घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक व गरजेच्या कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. तसेच, सामाजिक अंतर ठेवणे, सॅनिटाझरचा वापर करणे देखील महत्वाचे आहे.
लोणी भापकर गाव पूर्ण सील करण्यात आले आहे .आसपास चे तीन किमी क्षेत्र बफर झोन घोषित करण्यात आला आहे. शहरात श्रीरामनगर, समर्थनगर म्हाडा वसाहत, कल्याणीनगर परिसरसह तालुक्यात माळेगाव, कटफळ, मुर्टी, वडगांव निंबाळकर येथे आजपर्यंत रुग्ण आढळले आहेत. कटफळ येथील रुग्णावरमुंबईत, तर माळेगाव, मुर्टी, वडगांव निंबाळकर, कल्याणीनगर येथील रुग्णावर देखिल बारामती येथे उपचार सुरू आहेत. पुणे मुंबई येथून गावी येणाऱ्या नागरिकांमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतच आहे.