CoronaVirus News in Pune : कोरोनावरील औषधाच्या मानवी चाचणीस मिळाली मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 02:09 AM2020-05-22T02:09:10+5:302020-05-22T06:25:37+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : बाधित रुग्णांतील विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कंपनीचे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावा नोव्हालीड कंपनीने केला आहे.
पुणे : पुण्यातील नोव्हालीड फार्मा कंपनीच्या औषधांची कोरोनाबााधित रुग्णांवर चाचणी घेण्यास ड्रग कंट्रोल जनरल आॅफ इंडिया (डीसीजीआय) यांनी मान्यता दिली आहे. पुढील तीन-चार आठवड्यात या चाचण्या सुरू होणार असून, त्याचे प्रत्यक्ष परिणाम समोर येण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली. पुण्यासह देशभरातील विविध शहरांतील १०० कोरोनाबाधित रुग्णांवर ही चाचणी होणार आहे.
बाधित रुग्णांतील विषाणूचा संसर्ग कमी करण्यासाठी कंपनीचे औषध अधिक प्रभावी असल्याचा दावा नोव्हालीड कंपनीने केला आहे. हे औषध बाजारात आधीपासूनच विक्रीला उपलब्ध आहे. पण या औषधाचे नाव कंपनीकडून प्रसिद्ध केलेले नाही. सध्या या औषधाला ‘एनएलपी २१’ हा कोड देण्यात आला आहे. औषधाचे नाव किंवा कोणत्या आजारासाठी हे औषध वापरात आहे, हे सांगतिल्यास लोक खरेदीसाठी गर्दी करतील, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून हे औषध वापरात असून शरीरावर कोणतेही घातक परिणाम दिसत नाही. प्रयोगशाळेमध्ये कोरोनासाठी या औषधाच्या चाचण्या घेतल्यानंतर इतर औषधांपेक्षा त्याचा परिणाम अधिक वेगाने व प्रभावीपणे होत असल्याचे दिसून आल्याचा दावा कंपनीने केली, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रित देशपांडे यांनी दिली.