Coronavirus : नाही म्हणजे नाही..! मुलांचे बाहेर खेळणे काही दिवस करा बंद....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 02:20 PM2020-03-21T14:20:19+5:302020-03-21T14:21:20+5:30
मैदानांवर कोरोना विषाणू सहज शरीरात प्रवेश करू शकतात...
पुणे : कोरोना या साथीच्या आजाराच्या भयंकर संकटामुळे शाळांना काही दिवसांसाठी सुटी मिळाली आहे. त्यामुळे दिवस-रात्र घरात असलेल्या लहान मुलांना सांभाळायचे कसे, असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यातूनच मग खेळायला चालला का जा मग, असे सांगत मुलांना घराबाहेर पाठवले जात आहे. मात्र यात धोका असून मुलांना घरातच ठेवा, किमान काही दिवस तरी बाहेर जाऊ देऊ नका, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत आहे.
मुले प्रामुख्याने सोसायट्यांच्या बागांमध्ये, मैदानांमध्ये, तसेच गल्लीबोळात, रस्त्यांवर असे प्रकार जास्त दिसत आहेत. मुले एकत्र येऊन टीम तयार करतात, रस्त्यावर खेळतात. क्रिकेटपासून ते जुन्या लपाछपीपर्यंत असे कोणतेही खेळ त्यात असतात. मात्र हीच बाब मुलांसाठी धोकादायक आहे. संसर्ग सहज होण्यासारखीच ही परिस्थिती असल्यामुळे शक्यतो मुलांना घरातच ठेवावे, त्यासाठी घरात आहे त्या व्यक्तींनी त्यांना वेळ द्यावा, असे त्यांचे म्हणणे आहे.
क्रिकेटमधला चेंडू किंवा कोणत्याही खेळातील कोणतेही साहित्य त्यात सहभागी असलेल्या प्रत्येकाकडून हाताळले जाते. विषाणूचा संसर्ग यातून शक्य आहे. कोणता मुलगा आजारी आहे किंवा आजाराच्या उंबरठ्यावर आहे, हे काही ओळखू येत नाही. त्यामुळे संसर्ग कोणाकडून झाला, हेही सांगता येणार नाही. कोरोनाचा विषाणू संसर्ग त्वरित होत असल्यामुळेच गर्दीत जाऊ नका, गर्दी करू नका, असे सरकार सांगत आहे, त्यासाठी विविध उपाययोजना करीत आहे. शाळांना सुटी त्याचाच एक भाग आहे. मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवले तर हा उद्देशच साध्य होत नाही, असे काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’बरोबर बोलताना स्पष्ट केले.
बैठे खेळ खेळतानाही हा धोका आहेच. त्यात डोक्याला डोके लागते. मुले अगदी सहजपणे शिंकतात, खोकतात. हात स्वच्छ न करता सतत तोंडाला लावण्याची त्यांना सवय असते. काही खाण्याच्यापूर्वीही अनेकदा ते हात स्वच्छ करीत नाहीत. त्यामुळे बैठे खेळ खेळत असतानाही मुलांना संसर्ग होऊ शकतो. घरात कंटाळली, म्हणून मुलांनी बाहेर पाठविण्याचा हट्ट धरला तरीही त्यांना तसे करण्यास मज्जाव करा, शक्यतो त्याला घरातच बसवा किंवा फारच हट्ट धरला तर त्याच्याबरोबर बाहेर जात त्याला जवळच कुठेतरी फिरवून आणा, पण अन्य मुलांबरोबर त्याला गर्दीत सोडू नका, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
.......
*
संसर्ग होण्याची दाट शक्यता
कोण खेळत आहे याची माहिती नसते
कोण आजारी आहे ते कळत नाही
खेळण्याचे साहित्य अनेकांकडून हाताळले जाते.
दमल्यानंतर सहज प्रवृत्तीने घाम पुसला जातो.
मैदानांवर विषाणू सहज शरीरात प्रवेश करू शकतात
.............................
* कसे थांबवता येईल मुलांना घरातच?
त्यांच्याबरोबर वेगवेगळे बैठे खेळ खेळा
त्यांना गोष्टींची पुस्तके वाचायला द्या
मुले फार लहान असल्यास त्यांना गोष्टी वाचवून दाखवा
खाण्याचे पदार्थ त्यांच्या आवडीचे करा
त्यांना नात्यांची ओळख करून द्या
फारच कंटाळली तर दोन-तीन ओळखीची मुले एकत्र करून त्यांना खेळू द्या; मात्र त्यांच्यावर लक्ष ठेवा.