coronavirus : संचारबंदीचे उल्लंघन करणार्यांवर आता ड्रोनमधून नजर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 12:23 PM2020-03-29T12:23:15+5:302020-03-29T12:25:30+5:30
संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्राेनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे.
पुणे : कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला असला तरी अजूनही नागरिक रस्त्यावर येण्याचे थांबत नाही. विनाकारण फिरणार्यांवर नजर ठेवणेही पोलिसांना दिवसेंदिवस कठीण होत असून त्यांची शारिरीक क्षमतेची परिक्षा पाहणारी ठरत आहे. त्यामुळे आता संचारबंदीचे उल्लंघन करणार्यावर ड्रोनमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे.
याबाबत सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले की, शहराच्या अनेक भागात आता ड्रोन आकाशात भरारी घेणार आहे. जे कोणी नागरिक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर ड्रोनच्या माध्यमातून कारवाई केली जाणार आहे. या ड्रोनला स्पीकर लावण्यात आलेले असून त्याद्वारे नागरिकांना सूचना देखील देण्यास मदत होणार आहे.
लोकांना वारंवार सांगूनही लोक घराबाहेर पडण्याचे थांबत नाही. ड्रोनच्या मदतीमुळे पोलिसांचा ताण कमी होण्याबरोबरच संसर्गाचा धोकाही टळणार आहे. याशिवाय पोलिसांनासुद्धा अशा घराबाहेर पडणार्यांवर कारवाई करण्यासाठी डिजिटल पुरावा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या कठीण नागरिकांनी शासनाने घातलेल्या अटींचे पालन करावे, असे आवाहन डॉ़ शिसवे यांनी केले आहे.