Coronavirus : पुणे न्यायालयात होणार केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:07 PM2020-03-16T19:07:10+5:302020-03-16T19:10:07+5:30
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होणार आहे. पक्षकारांनी गरज असेल तरच न्यायालयात यावे; अन्यथा येऊ नये, असा निर्णय पुणे बार असोसिएशन आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांच्या बैठकीत सोमवारी झाला. येरवडा कारागृहातील बंदींना व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे न्यायालयात हजर करण्याबाबतचाही निर्णय झाला आहे.
राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आहेत. या आजाराची लागण होऊ नये, यासाठी सर्व स्तरांतून काळजी घेतली जात आहे. अद्याप नागरिकांमध्ये कोरोनाविषयी भीती आहे. त्याबद्दल अनेक गैरसमजदेखील आहेत. याविषयीची योग्य माहिती देण्यासाठी न्यायालयाच्या आवारात भित्तीपत्रके लावली आहेत. आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आता महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी घेण्याचे पत्र पुणे बार असोसिएशनने प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. पी. धोटे यांना दिले होते. या पार्श्वभूमीवर बारचे पदाधिकारी व धोटे यांच्यात बैठक झाली. त्यामध्ये पक्षकार हजर राहिले नाहीत, तर त्यांच्याविरोधात सुनावणी करणार नसल्याचा निर्णय झाला आहे. याबाबत धोटे अंतर्गत आदेश काढणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सतीश मुळीक म्हणाले, की महत्त्वाच्या जामीन, मनाई, स्थगिती आदेश, संपत आलेली प्रकरणे, बाहेरगावहूनपक्षकार आलेल्या प्रकरणात सुनावणी घेण्यास प्राधान्य देणार आहे. इतर प्रकरणांना पुढील तारखा देणार आहेत. नागरिकांनी सुनावणीबाबत कोणतीही भीती बाळगू नये. त्यांच्या अपरोक्ष सुनावणी होणार नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने येरवडा कारागृहातील बंद्यांना प्रत्यक्ष हजर करू नये; तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.