coronavirus : काेराेनाबाधित देशातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना ठेवणार वेगळे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 08:35 PM2020-03-12T20:35:48+5:302020-03-12T20:37:43+5:30
काेराेनाबाधित देशांमधून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांना वेगळे ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.
पुणे : दुबईवरुन गुरुवारी आणि शुक्रवारी पुण्यात येणाऱ्या विमानातील प्रवाशांची तपासणी पुणे विमानतळावर करण्यात येणार आहे. त्यांच्यापैकी ज्या प्रवाशांनी 15 फेब्रुवारीनंतर काेराेनाबाधित देशांमध्ये प्रवास केला आहे, त्यांना वेगळे ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. असे असले तरी केवळ दुबईतून येणारे आणि काेराेनाबाधित देशातून दुबईमार्गे पुण्याला येणारे प्रवासी एकाच विमानात असल्याने त्या प्रवाशांना देखील काेराेनाची लागण हाेण्याची शक्यता आहे.
पुण्यात सर्वप्रथम दुबईतून आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आणखी सात जणांना काेराेना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुबई या शहराचा उल्लेख काेराेनाबाधित देशांच्या यादीमध्ये नसल्याने त्या दांपत्याची तपासणी करण्यात आली नव्हती. त्यांच्या संपर्कात आलेल्या सात नागरिकांना काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले आहे. विभागीय आयुक्त म्हणाले, दुबईवरुन गुरुवारी आणि शुक्रवारी विमान येणार आहे. या विमानातील प्रवाशांची तपासणी करण्यात येणार आहे. यातील जे प्रवासी 15 फ्रेब्रुवारीनंतर केंद्र सरकाने जाहीर केलेल्या काेराेनाबाधित देशांमधून दुबईत आले असतील तर त्यांना पुणे विमानतळावर वेगळे करुन त्यांना वेगळ्या ठिकाणी निगराणीखाली ठेवण्यात येणार असून त्यांची काेराेनाची तपासणी करण्यात येणार आहे. यांच्यापैकी एखाद्याला काेराेनाची लक्षणे नसली तरी त्यांना वेगळे ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान अशा प्रवाशांच्या नागरिकांनी त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर येऊ नये असे आवाहन म्हैसैकर यांनी केले. तसेच अशा प्रवाशांना संपर्काची सर्व माध्यमे उपलब्ध करुन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.