अमेरिकेतून आलेल्या नागरिकाला काेराेनाची लागण ; पुण्यातील बाधितांची संख्या 9 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 07:31 PM2020-03-12T19:31:37+5:302020-03-12T19:33:49+5:30
पुण्यात काेराेनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून अमेरिकहून आलेल्या एका नागरिकाला काेराेना झाल्याचे समाेर आले आहे.
पुणे : पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतून आलेल्या एका नागरिकाला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आले असून पुण्यातील काेराेनाबाधितांची संख्या आता 9 वर पाेहचली आहे. सर्व बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी दिली.
दुबईहून पुण्यात आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाल्याचे समाेर आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर नागरिकांना देखील काेराेनाची लागण झाली. त्यानंतर प्रशासनाकडून खबरादारी घेण्यात येत असून काेराेना संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे. अमेरिकेहून एक मार्च राेजी पुण्यात आलेल्या एका नागरिकाला काेराेनाची लागण झाल्याचा अहवाल प्रयाेगशाळेतून देण्यात आला आहे. या नागरिकाची तपासणी 11 मार्च राेजी करण्यात आली हाेती. यापूर्वी पुण्यात आढळलेले काेराेनाचे रुग्ण हे दुबईहून पुण्यात आलेल्या दांपत्याचा संपर्कात आले हाेते, परंतु आता या चेनच्या बाहेरची व्यक्ती काेराेनाबाधित आढळल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
आत्तापर्यंत पुण्यातील 214 नागरिकांची काेराेनाची तपासणी करण्यात आली असून त्यातील 158 नागरिकांचे रिपाेर्ट काेराेना निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी साेडण्यात आले. काेराेनाचा उद्रेक झालेल्या काळात 614 पुण्यातील लाेक विविध देशांमध्ये गेले हाेते. त्यांची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी करण्यात येत आहे.