coronavirus : पुणेकरांसाठी महापालिका आली धावून ; जीवनावश्यक वस्तूंसाठी खास हेल्पलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:51 PM2020-03-24T19:51:30+5:302020-03-24T19:52:50+5:30
लाॅकडाऊनमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळविण्यात अडचणी आल्यास त्यासाठी पुणे महापालिकेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
पुणे : पुणे शहरासह संबंध राज्यात वेगाने वाढणाऱ्या कोरोना विषाणू च्या संसर्गाला आळा घालण्यासाठी, या संदर्भातील खबरदारी म्हणून 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. मात्र या कालावधीत जीवनावश्यक वस्तू व सेवांचा पुरवठा सुरू ठेवण्यात आला आहे. या सेवा मिळविण्यात नागरिकांना अडचणी येऊ नयेत, यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने खास हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त व पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी दिली.
कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत अन्न, औषधे अशा जीवनावश्यक वस्तूंची गरज नागरिकांना भासू शकते. तसेच आरोग्याच्या दृष्टीने काही वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत आपल्या भागातील संबंधित सेवा उपलब्ध नसल्यास नागरिकांनी 020-25506800, 020-25506801, 020-25506802, 020-25506803 व 020-25501269 या क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना त्या सेवा कुठे उपलब्ध होतील याबाबतची माहिती मिळणार आहे. तसेच या क्रमांकावर संपर्क केल्यास त्या सेवा उपलब्ध करून देण्यात आवश्यक ती मदत प्रशासकीय पातळीवर केली जाईल अशी ग्वाही, अग्रवाल यांनी दिली.