coronavirus : परदेशातून आलेल्या 20 हजार लाेकांवर ठेवलं पुणे महापालिकेने लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 03:38 PM2020-04-08T15:38:09+5:302020-04-08T15:39:31+5:30
काेराेनाचा प्रादुर्भाव पुण्यात माेठ्याप्रमाणावर वाढू नये यासाठी पुणे महानगरपालिकेकडून तब्बल 20 हजार नागरिकांवर नजर ठेवण्यात आली.
पुणे : काेराेनाची सुरवात चीनमधून झाली. त्यानंतर जगभरातील विविध देशांमध्ये हा राेग पसरला. 31 जानेवारीला भारतात पहिला काेराेनाचा रुग्ण आढळला त्यानंतर भारतातही हा राेग आल्याचे स्पष्ट झाले. या काळात विदेशातून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष दिले जात हाेते. पुण्यात पहिला रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्यावतीने परदेशातून आलेल्या तब्बल 20 हजार नागरिकांवर लक्ष ठेवण्यात आले. त्याचबराेबर त्यांचे ट्रॅकिंगही करण्यात आल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
9 मार्चला पुण्यात पहिले काेराेनाचे रुग्ण आढळले. दुबईवरुन आलेल्या दांपत्याला काेराेनाची लागण झाली हाेती. त्यानंतर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत तातडीने उपाययाेजना करण्यात सुरुवात केली. परदेशातून आलेल्या नागरिकांना काेराेनाची लागण हाेत असल्याने त्यांच्यावर महापालिकेच्याकडून विशेष लक्ष देण्यात आले. या काळात परदेशातून पुण्यात तब्बल 20 हजार नागरिक आले हाेते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम महापालिकेकडून करण्यात आले.
शेखर गायकवाड म्हणाले, पुण्यात आलेल्या 20 हजार प्रवाशांपैकी साडेसात हजार नागरिक हे दुबई या ठिकाणावरुन आले हाेते. त्यांच्यावर आम्ही विशेष लक्ष ठेवून हाेताे. त्या प्रत्येकाचे जीपीएस मॅपिंग करण्यात येत हाेते. त्यामुळे ती व्यक्ती कुठे आहे हे आम्हाला समजत हाेते. या नागरिकांचे समुपदेशन पालिकेकडून करण्यात आले तसेच त्यांना हाेम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याचबराेबर ज्या भागात विदेशातून नागरिक आले हाेते, त्या भागातील साेसायट्यांच्या आजूबाजूचा परिसर तातडीने सॅनटाईज करण्यात आला.
देशात पहिला रुग्ण आढळला हाेता, तेव्हाच पालिकेने सर्व व्यवस्था केली हाेती. पुण्यात पहिला रुग्ण आढळण्याच्या आधी आठवडाभरापूर्वीच पालिकेने 4 हजार पीपीई किट एन 95 मास्क, ग्साेज डाॅक्टरांसाठी तयार ठेवले हाेते. याचा फायदा असा झाला की इतर शहरांना हे किट मिळताना अडचणी येत असताना पुण्यात याचा पुरेसा साठा हाेता. स्वाईन फ्लूचा अनुभव असणारे अनेक डाॅक्टर पुण्यात असल्याने त्यांनी याला धैर्याने या प्रश्नाला ताेंड दिले. असेही गायकवाड म्हणाले.