coronavirus : सामान्य नागरिकांसाठी पीएमपीची सेवा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 08:17 PM2020-03-23T20:17:00+5:302020-03-23T20:17:36+5:30
काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी आता पुण्यातील सार्वजनिक वाहतूक असलेली पीएमपी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे : काेराेनाचा प्रभाव वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांना घराबाहेर पडता येणार नाही. आता पुण्याची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेली पीएमपीची बससेवा सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच बस रस्त्यावर धावणार आहे.
पुण्याचे विभागीय आयुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांच्या आदेशानुसार आता पीएमपीची सेवा बंद करण्यात आली आहे. मंगळवार (दि. 24 ) पासून केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. ओळखपत्र पाहूनच अशा कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या प्रेसनाेटमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे.
मंगळवारपासून पुढील आदेश मिळेपर्यंत फक्त 10 टक्के बस रस्त्यावर धावणार आहेत. या बसेस अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांकरीताच असणार आहे. ही सेवा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसणार आहे. शासकीय व खाजगी रुग्णालये, पाेलीस, बॅंक, अग्निशमन दल, महावितरण, सफाई कर्मचारी, विद्युत कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी आदींनाच या बसमधून प्रवास करता येणार आहे. त्याचबराेबर रुग्णांच्या नातेवाईकांनाच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या सर्वांना ओळखपत्र पाहूनच बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचबराेबर प्रवाशांना बसमध्ये एका आड एक सिट साेडूनच बसावे लागणार आहे.