coronavirus : लाठ्या मारणारे पोलिसांचे हात मदतीसाठी सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 07:11 PM2020-03-27T19:11:08+5:302020-03-27T19:12:18+5:30
लाॅकडाऊनमुळे अनेकांचा राेजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना पाेलिसांकडून मदत करण्यात येत आहे.
पुणे : लॉक डाऊनचा आदेश न पाळता विनाकारण फिरणार्यांना पोलिसांनी आपल्याकडील लाठीचा प्रसाद दिल्यानंतर आता अडीअडचणीत सापडलेल्यांना पोलीस मदतीसाठी पुढे सरसावले आहे.
विश्रांतवाडी, हडपसर येथे भुकेलेल्यांना पोलिसांनी जेवण वाढले बिबवेवाडी येथे बिगारी काम करणार्या कुटुंबियांना पोलिसांनी घरी जाऊन मदत केली.
शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अजय साळुंखे (रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन मदतीची विनंती केली. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार अमृत पाटील व हवालदार तनपुरे यांनी घटनास्थळाला भेट दिली़ तेव्हा त्यांनी आपण, पत्नी व पाच मुले घरी उपाशी आहोत. खायला काही नाही, असे सांगितले. त्यावर पोलीस शिपाई गुजर, सागर, राख यांनी दोन किलो तांदुळ, साखर, चहा पावडर, बटाटे, तेल, दुध, भाजीपाल असे साहित्य तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी मंगेश बोंबले यांनी १ हजार रुपये रोख व बिस्कीट पुडे अशी मदत या कुटुंबियांना केली.