CoronaVirus Positive News : कोरोनाबाधित वाढणारच पण घाबरू नका ,९५ टक्क्यांपेक्षा जास्त रूग्ण होताहेत पूर्णपणे बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 12:10 PM2020-06-16T12:10:18+5:302020-06-16T12:18:59+5:30
दिवसागणिक कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहून घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही...
निलेश राऊत -
पुणे : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अधिकाधिक कोरोनाबाधित उजेडात येणे जरूरी असून त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी, प्रशासकीय यंत्रणेने कोरोना संशयितांच्या तपासणीचे प्रमाण वाढविले आहे. यामुळे दिवसांगणिक कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच जाणार आहे. पण कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा पाहून घाबरून जाण्याचे मुळीच कारण नाही. कारण एकूण कोरोनाबाधितांपैकी तब्बल ९५ टक्के रूग्ण पूर्णपणे बरे होत असल्याचे आत्तापर्यंत आढळून आले आहे.
पुणे महापालिकेने सादर केलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट होत आहे. पुणे शहरात रविवारी रात्रीपर्यंत शहरातील एकूण कोरोनांचा आकडा ९ हजार ६५६ इतका असला तरी, यापैकी ६ हजार २१० रूग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनामुक्त होण्याची (रिकव्हरी रेट) टक्केवारी ही साधारणत: ६५ टक्के इतका सद्यस्थितीला दिसत आहे. जे रूग्ण (अॅक्टिव्ह रूग्ण) विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत त्यांच्यापैकी बहुतांशी जण हे पूर्णत: बरे होणारे आहेत. तर ज्यांचा मृत्यू होत आहे त्यामध्ये अनेक जण हे ६० वर्षांपुढील तथा विविध अन्य आजाराने ग्रस्त असले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रूग्णांपैकी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पाहता ते ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पुण्यातील मृत्यू दर हा देखील साडेचार ते पाच टक्के पर्यंतच सध्यातरी मर्यादित असल्याचे विविध आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
पुणे शहरात ९ मार्च रोजी पहिला कोरोनाचा रूग्ण आढळून आला. १४ जूनअखेर हा आकडा ९ हजार ६५६ वर गेला. तर यापैकी ४४८ जणांचा मृत्यू झाला ही टक्केवारी ४.६ टक्के इतकीच आहे. ज्या शहरांमध्ये अधिकाधिक तपासणीचे प्रमाण आहे त्यामध्ये पुणे शहराचा क्रमांक हा अव्वलस्थानी आहे. कोरोनाबाधित शोधून त्यांच्यावर वेळेत उपचार होणे व त्यांच्यापासून इतरांना होणारा संभाव्य संसर्ग टाळणे हा या मागचा उद्देश आहे. परिणामी आजपर्यंत ७१ हजार ४२५ जणांची तपासणी करून त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने (स्वॅब) प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले़ आहेत. त्यामुळे भविष्यात लॉकडाऊन उठल्यावर (दैनंदिन व्यवहार पूर्वरत झाल्यावर) रूग्ण संख्या वाढणार हे निश्चितच आहे. परंतु, कोरोना संसर्गाचा आकडा वाढला तरी, कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण उत्तम असल्याने कोरोनाच्या तपासणीकडे नागरिकांनी सकारात्मकतेने पहावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
------------------
पुणे शहरातील कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ६५ टक्क्यांच्यावर गेलेले आहे. मृत्यूदर वगळता अन्य जे गंभीर रूग्ण आहेत, त्यांचा हॉस्पिटलमधील उपचाराचा कालावधी केवळ जास्त आहे. म्हणून कोरोनामुक्त होणाऱ्यांची प्रत्यक्षात असलेली ९५ टक्क्यांपेक्षा अधिकची टक्केवारी लवकरच कळून येत नाही. व्हेंटिलेटरवर असलेल्या रूग्णांपैकीही ३० टक्के रूग्णही पूर्णपणे बरे होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात आत्तापर्यंत जेवढे कोरोनाबाधित विविध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत. त्यापैकी ६५ टक्के रूग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. अन्य आजार असलेले रूग्णच जास्त काळ हॉस्पिटलमध्ये राहत आहेत. कोरोनाची लागण झाली तरी घाबरून न जाता सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे जरूरी आहे.
डॉ. संजीव वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी पुणे महापालिका.
------------
तपासणी वाढविण्याचे फायदे
* जास्तीत जास्त बाधितांपर्यंत पोहचता येईल
* कोरोनाचा संसर्ग रोखता येईल
* वेळेत त्यांना उपचारासाठी दाखल करून घेता येईल
* त्यांच्या संपर्कात आलेले इतर जण लवकर शोधता येतील
* कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार मिळाल्याने, भविष्यातील संभाव्य धोका टाळता येऊ शकतो़
---------------------------
राज्यात ४९.१४ तर पुण्यात २९.४२ टक्के अॅक्टिव्ह रूग्ण
कोरोनाबाधितांपैकी कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण पुणे शहरात जास्त असून, राज्याच्या तुलनेत ते पुण्यात दुप्पटीने अधिक आहे़ देशात एकूण अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही ४७.८७ टक्के, राज्यात ४९.१४ टक्के तर पुण्यात हीच टक्केवारी २९.४२ टक्के आहे.
देशातील कोरोनाबाधित संख्या व अॅक्टिव रूग्ण संख्या (१२ जूनपर्यंतची आकडेवारी)
एकूण कोरोनाबाधित पूर्ण बरे झालेले उपचार घेत असलेले ( अॅक्टिव्ह रूग्ण ) मृत्यू
देश २,९८,२८३ १,४६,९७२ १,४२,७९५ ८,५०१
राज्य ९७,७४८ ४६,९७८ ४७,९८० ३,५९०
पुणे ८,७७७ ५,७८२ २,५८२ ४१३़
------------------------------------------