Coronavirus positive news : ‘त्या’ आईच्या चेहऱ्यावरील 'वात्सल्या'ने दिली ऊर्जा;पुण्यातील ससूनच्या परिचारिकेचा रोमांचकारी अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2020 11:20 AM2020-06-05T11:20:57+5:302020-06-05T11:27:07+5:30
दोन वर्षांच्या बाळासह उपचारासाठी दाखल झालेल्या एका आईला पाहिले आणि माझ्या मुलांचे चेहरे नजरेसमोर आले. त्या महिलेला धीर दिला..
नारायण बडगुजर-
पिंपरी : पोरींनो... हे खूप छान काम आहे, लय भारी सेवा करताय तुम्ही, असे कोरोनाग्रस्त वृद्ध महिला म्हणाली आणि ते मनाला भिडले. त्या महिलेला पाहून आईची आठवण झाली. तर दुसरीकडे दोन वर्षांच्या बाळासह उपचारासाठी दाखल झालेल्या एका आईला पाहिले आणि माझ्या मुलांचे चेहरे नजरेसमोर आले. त्या महिलेला धीर दिला. तिच्या मुलाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे आनंदीत झालेल्या त्या आईच्या चेहऱ्यावरील 'वात्सल्य'आम्हाला 'नव ऊर्जा' देणारे ठरले. हे अनुभव कथन आहेत पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या कोरोना सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या एका परिचारिकेचे.
अनिता मंगेश जांभळे (रा. साई मल्हार कॉलनी, तापकीर चौकाजवळ, काळेवाडी) असे परिचारिकेचे नाव आहे. अनिता यांचे पती मंगेश हे अभियंता असून एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांचा मोठा मुलगा ओम इयत्ता नववी, तर लहान मुलगा स्पर्श हा इयत्ता दुसरीत शिकत आहे. अनिता यांचे सासरे पद्माकर जांभळे हे वयोवृद्ध असून मधुमेह विकारांनी ते त्रस्त असतात. तसेच पडल्याने हाताला दुखापत झाल्याने सासू कल्पना यांना कोणतेही काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे एक गृहिणी म्हणून अनिता यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.
ससून रुग्णालयात अनिता जांभळे परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात कोरोनाबाधित रुग्ण दाखल करण्यात येतात. रोटेशननुसार या अतिदक्षता विभागात अनिता यांची आठ दिवसांसाठी ड्यूटी लागली. त्यामुळे त्यांना एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली. त्यावेळी घरच्यांचा निरोप घेताना त्यांना प्रत्येकांची चिंता वाटत होती. मात्र, कोरोना योद्धा असल्याने कर्तव्याची देखील जाण होती. त्याच जाणिवेतून त्यांनी कोरोना रुग्णांच्या सेवेचे व्रत आनंदाने स्वीकारले.
अनिता त्याबाबत म्हणाल्या, कोरोनाची बाधा झालेले अतिगंभीर रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल करण्यात येतात. त्यामुळे या रुग्णांची देखभाल करताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पीपीई किट परिधान करावे लागायचे. त्यानंतर सहा ते सात तास काहीही न खाता-पिता कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करायची. असा दिनक्रम होता. अतिदक्षता विभाग असल्याने तेथे काही रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे या विभागात बहुतांश वेळा दु:खद वातावरण निर्माण झाले. याचा इतर काही रुग्णांना मानसिक त्रास झाला. मात्र, त्यांना धीर देत त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न केले. त्यासाठी खबरदारी घेत त्यांच्याशी संवाद साधला.
एक वयोवृद्ध महिलेने आमचे काम पाहिले. त्यांना श्वसनाचा त्रास होता. तरीही व्हेंटिलेटर बाजूला करून त्या आमच्याशी बोलल्या. पोरींनो... हे खूप छान काम आहे, लय भारी सेवा करताय तुम्ही, असे त्या म्हणाल्या. त्यामुळे आईची आठवण झाली. मृत्यूशी झुंज सुरू आहे, तरीदेखील ती महिला आपल्या कामाचे कौतुक करतेय ही बाब मनाला भिडली. दरम्यान, त्याचवेळी एक चिमुकले बाळदेखील या विभागात दाखल झाले. त्यानंतर लगेचच दोन वर्षांचे मूलही दाखल झाले. चिमुकल्या बाळाचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मात्र, दोन वर्षांच्या मुलाचे रिपोर्ट आले नाहीत. त्यामुळे त्याची आई रडत होती. माझ्या मुलाचे रिपोर्ट का नाही आले, काही झाले तर नाही ना, अशा अनेक शंकांनी तिचे मन चिंताग्रस्त होते. ते पाहून मलादेखील माझ्या मुलांचे चेहरे आठवले. मात्र, भावनिक होण्याची ती वेळ नव्हती. त्या महिलेला धीर दिला. तिची समजूत काढली. मुलाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर तिच्यासह आमच्या सर्वांना आनंद झाला.
पीपीई किट उतरविणे अवघड...
पीपीई किट परिधान करणे किचकट वाटते. मात्र, त्याहीपेक्षा ते अंगावरून काढायला अवघड आहे. कारण आपण थेट कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेलो असतो. अशावेळी विषाणू त्या किटवर असण्याची शक्यता असते. त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून किट उतरवताना खूप खबरदारी घ्यावी लागते, असे अनिता यांनी सांगितले.
स्वागताने भारावून गेले..
आठ दिवस ड्यूटी केल्यानंतर आठ दिवस त्याच हॉटेलमध्ये क्वारंटाइन केले होते. कोरोना चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर घरी आले. त्यावेळी घरच्यांनी व परिसरातील नागरिकांनी तसेच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे भारावून गेले. दरम्यान, मुलांनी व पतीने माज्या सासूबाइंर्ना घरकामात मदत केली. १५ दिवस त्यांना कसरत करावी लागली. मात्र, त्यातही त्यांनी आनंद मानला, ही समाधानाची बाब आहे, असे अनिता यांनी सांगितले.