CoronaVirus Positive News : पुण्यातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा ' नो कोरोना पॅटर्न '
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:00 AM2020-05-14T07:00:00+5:302020-05-14T07:00:07+5:30
तब्बल १०० एकरांचा परिसर... लोकसंख्या सुमारे ७० हजार आणि १०८ गल्ल्या असलेल्या झोपडपट्टी वसाहतीत कोरोनाची जादू चालली नाही..
लक्ष्मण मोरे -
पुणे : तब्बल १०० एकरांचा परिसर... लोकसंख्या सुमारे ७० हजार आणि १०८ गल्ल्या... हा आवाका आहे शहरातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा. एकीकडे झोपडपट्टीबहूल भागात कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच 'जनता वसाहती'ने मात्र गाव करील ते राव करील काय याचा प्रत्यय दिला आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या कष्टकरी वसाहतीमध्ये अद्याप एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आलेला नाही. स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने केलेल्या उपाययोजनांमुळे वस्ती आतापर्यंत सुरक्षित राहिली आहे.
जनता वसाहत सुरु होते पर्वतीजवळच्या निलायम पुलाजवळ; तर संपते विठ्ठलवाडीच्या जवळ. जवळपास दीड-दोन किलोमिटरपर्यंत डोंगराच्या उतारावर वसलेली ही वस्ती गुन्हेगारीसाठीही तशी प्रसिद्धच. परंतू, गेल्या दीड महिन्यात मारामा-या, गुन्हेगारी बंद झालेली आहे. नागरिकांनी बाहेर जाणे प्रकर्षाने टाळलेले आहे. तर, अत्यावश्यक सेवेखेरीज अन्य कोणीही कामासाठी बाहेर पडत नाही.
वसाहतीमध्ये कोणी बाहेरगावाहून आलेले असले किंवा कोणाला सर्दी-खोकला-ताप अशी लक्षणे दिसली की तात्काळ शेजारचे नागरिक कार्यकर्त्यांना कळवितात. लगोलग त्या नागरिकाची तपासणी केली जाते. परप्रांतिय कामगारांबाबत या वसाहतीने दाखविलेली संवेदनशीलताही कौतुक करण्यालायक आहे. शहरातील कोरोनाची आकडेवारी पाहता झोपडपट्ट्या सर्वाधिक बाधित झाल्याचे दिसून येते आहे. परंतू, या वसाहतीच्या एक ते दोन किलोमीटरच्या परिघात कोरोनाचे शेकडो रुग्ण आढळून आलेले असतानाही केवळ स्वयंशिस्त, स्वयंस्फूर्तपणा आणि जनता वसाहत कृती समितीसह कार्यकर्त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाला दूर ठेवणे शक्य झाल्याचे सकारात्मक चित्र याठिकाणी दिसते आहे.
==========
कंटेन्मेंट झोन नसतानाही रस्ते पडतात ओस
जनता वसाहत झोपडपट्टी ही कंटेन्मेंट झोनमध्ये नसूनही दुपारी दोनपर्यंतच दुकाने उघडी ठेवली जातात. त्यानंतर, स्वयंस्फुर्तीने दुकाने बंद केली जातात. नागरिकही त्यानंतर अजिबात घराबाहेर पडत नाहीत.
==========
वसाहतीमध्ये जाण्याकरिता एकूण पाच रस्ते आहेत. हे सर्व रस्ते कालव्यावरील पुलाच्या स्वरुपातील आहेत. पर्वतीजवळील मुख्य प्रवेशद्वार सोडल्यास अन्य सर्व रस्ते पत्रे, अडथळे लावून बंद करण्यात आले आहेत. यासोबतच पर्वती टेकडीवर जाणारे रस्ते आणि पायवाटाही बंद करण्यात आल्या आहेत. केवळ एकच मार्ग खुला ठेवण्यात आला असून तो सुद्धा निम्मा बंद करण्यात आला असून निम्म्या भागावर सॅनिटायझर कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामधून वाहनासकट जाता येते.
=========
जनता दवाखान्यात दिवसाला १५०-२०० नागरिकांची तपासणी
वसाहतीमधील जनता दवाखान्यामध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. दिवसाकाठी १५० ते २०० नागरिकांची स्क्रिनिंग या ठिकाणी केली जाते. नागरिक स्वत:हून येऊन तपासणी करुन जाताता.
==========
पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाची एक, १०८ आणि शिवसेनेने उपलब्ध करुन दिलेल्या एकूण तीन रुग्णवाहिका आहेत. शिवसेनेची रुग्णवाहिका वसाहतीमध्येच उभी असते. कोणाला काही आवश्यकता भासल्यास या रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करुन दिली जाते.
==========
सौम्य अथवा सदृश लक्षणे दिसली तरी लगेच त्यांची तपासणी करुन घेतली जाते. आवश्यकता असल्यास स्वाब तपासणी केली जाते. आतापर्यंत २०० नागरिकांची नायडू, ससून आणि लायगुडे रुग्णालयात तपासणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट निगेटीव्ह आलेले आहेत. पोलिसांसह स्वच्छता कर्मचारी, पालिका कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबीरांचे आयोजन करुन तपासणी करण्यात आली आहे. भारतीय जैन संघटनेच्या डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत साडेचार हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
===========
नागरिकांना भाजी खरेदी करण्याकरिता बाहेर जावे लागू नये म्हणून वसाहतीमध्येच अल्पदरात भाजी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अवघ्या १०१ रुपयात सहा भाज्या नागरिकांना मिळत असल्याने नागरिकही बाहेर जात नाहीत.
===========
परप्रांतीय नागरिकांना घरी जाण्याकरिता त्यांची यादी करुन अर्ज भरुन घेणे, त्यांची नोंदणी करणे आणि गावी जाण्याकरिता मदत करण्याचे कामही कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
===========
वाहनावर भोंगे लावण्यात आलेले असून हे वाहन दररोज वसाहतीमध्ये फिरवत कोरोनासंदर्भात सूचना केल्या जातात. यासोबतच स्वच्छता, सॅनिटायझेशन, मास्क वापर याबाबत प्रबोधन केले जाते. वसाहतीमधील शाळेमध्ये विलगीकरण कक्ष सुरु करण्याचा पालिकेचा प्रयत्नही कृती समितीने हाणून पाडला.
===========
नागरिकांना रेशन मिळावे याकरिता कूपन पद्धती वापरण्यात आल्याने वसाहतीमधील सातही रेशन दुकानांवर गर्दी झाली नाही हे विशेष. या भागातील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गदादे-पाटील, निलेश पवार, वाळूंजकर काका यांच्यासह स्थानिक नगरसेवकांनीही मोठ्या प्रमाणावर काम केले.
==========
वसाहतीला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याकरिता शक्य असलेल्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. जागेवरच भाजी उपलब्ध करुन देण्यासोबतच, सर्व रस्ते बंद करणे, लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करणे, लोकांचे प्रबोधन, तपासणीवर भर देण्यात येत आहे. सुदैवाने शहरातील सर्वात मोठी वसाहत कोरोनापासून संरक्षित राहिली आहे. यामध्ये नागरिकांचा संयम, स्वयंशिस्त अत्यंत महत्वाची आहे.
- सूरज लोखंडे, अध्यक्ष, जनता वसाहत कृती समिती
===========
जनता वसाहतीमध्ये कोरोनाचा उद्रेक होण्याची खूप भिती होती. आम्ही प्रबोधनापासून सुरुवात केली. दुकानांबाहेर चौकोन आखले. हातावरचं पोट असलेल्या या कष्टक-यांनी मात्र, पालिका, पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या सर्व सूचना पाळल्या. सर्व उपाययोजनांना प्रतिसाद दिला. पर्वतीजवळ चौकी उभारली होती. कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या अन्नपाण्याची सोयही केली. पोलिसांनी आपल्या कर्तव्यासोबतच सामाजिक भान जपत लोकांच्या अडचणीही समजून घेत काम केले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम पहायला मिळाला.
- देविदास घेवारे, वरिष्ठ निरीक्षक, दत्तवाडी पोलीस ठाणे