चिंताग्रस्त पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी;फक्त कोरोनामुळे पुण्यात एकही नाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 05:33 PM2020-05-22T17:33:54+5:302020-05-22T18:02:05+5:30
मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये पहिल्यापासूनच बहुतांशी रूग्णांना विविध आजार
नीलेश राऊत-
पुणे : पुणे शहरात २१ मेच्या रात्रीपर्यंत झालेल्या २२७ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूमध्ये, केवळ कोरोनामुळे मृत्यू झालेला एकही रूग्ण नाही. तर ज्या कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यातील बहुतांशी रूग्णांना मधुमेह (डायबेटिस) व उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) चा त्रास असल्याचे दिसून आले आहे. याचबरोबर श्वसन विकार, किडणी विकार, हृदयविकार व लठ्ठपणा हे आजारही अनेकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील उपलब्ध नोंदणीनुसार, शहरात झालेल्या एकूण कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूमध्ये १४३ पुरूष व ८४ महिलांचा समावेश आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे ६१ ते ७० या वयोगटातील असून ही संख्या ७२ इतकी आहे.
शहरात कोरोनाचा पहिला रूग्ण ९ मार्च रोजी आढळून आला. त्यानंतर पहिला कोरोनाचा बळी ३० मार्च रोजी गेला. आजतागायत शहरात २२७ जणांचा कोरोनाबाधित म्हणून मृत्यू झाला असला तरी, यामध्ये केवळ कोरोनामुळेच दगावला असा एकही रूग्ण नाही. मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये बहुतांशी रूग्णांना विविध आजार पहिल्यापासूनच असल्याचे आढळून आले आहे. २२७ कोरोनाबाधित मृत्यूपैकी ५ जण हे मद्यपी होते. तर तीन जणांचा हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
कोव्हिड-१९ या विषाणूमुळे अन्य आजार, विशेषत: अति मधुमेह व रक्तदाब असलेल्या रूग्णांची मोठ्या प्रमाणात फुफसे निकामी होतात.परंतू, ज्यांना अन्य आजार नाही किंवा कोरोनाची सौम्य स्वरूपाची लक्षणे आहे. ते पूर्णपणे बरे होतात. अन्य आजार असलेल्या व्यक्तीलाच कोविड-१९ चा विषाणू आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे आत्तापयंर्ताच्या रूग्ण तपासणीत आढळून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे साथरोग प्रतिबंधक विभागाचे प्रमुख डॉ.संजीव वावरे यांनी दिली.
दरम्यान ज्यांना कुठलाही आजार नाही अशी ८३ वर्षीय व्यक्ती तर सहा महिन्याचे बालकही, कोविड-१९ ची बाधा झाल्यावर उपचाराअंती त्यावर मात करू शकतो असे उदाहरणही पुण्यात आढळून आले आहे. त्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, अशा रूग्णांना कोणताही धोका नाही. राज्याची व देशाची तुलना करता पुण्यातील सद्याचे कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण हे ५२ टक्के आहे.
------------
कोरोनाबाधित म्हणून ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अनेकांना एकाच वेळी उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसन विकार असेही विविध आजार असल्याचे पाहण्यास मिळाले आहे. मृत व्यक्तींच्या आजारपणाच्या उपलब्ध नोंदीनुसार एकूण रूग्णांमध्ये खालील अन्य आजार आढळून आले. (मधुमेह व रक्तदाब व श्वसन विकार हा एकत्रित आजार असणारेही अनेकजण यात आहेत, यामुळे एकत्रित आकडा हा मृत्यू संख्यपेक्षा जास्त दिसेल)
मधुमेह : ७१
रक्तदाब : ८०
श्वसन विकार : २४
लठ्ठपणा : १०
मद्यपी : ५
किडणी विकार : १९
हृदयविकार : १४
फुफस विकार : २
मल्टी आॅरगन फेल्युअर : २
निद्रानाश : ३
क्षयरोग : ४
डेंग्यु : २
यांच्यासह मृत्यू झालेल्या काही कोरोनाबाधित रूग्णांना थायरॉईड, पक्षाघात, दमा, मूत्रविकार व अन्य आजार आहेत.
------------------
मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाबाधित रूग्णांमध्ये सर्वाधिक रूग्ण हे ६१ ते ७० वयोगटातील असून, ही संख्या ७४ इतकी म्हणजेच मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ३२ टक्के आहे. तर ७१ ते ८० वयोगटातील ही संख्या ४३ असून ही टक्केवारी एकूण मृत्यूच्या १८ टक्के, ५१ ते ६० वयोगटातील संख्या १९ टक्के तर ४१ ते ५० वयोगटातील संख्या ३५ असून ही टक्केवारी १५ टक्के आहे. या सर्व वयोगटातील कोरोनाबाधित रूग्णांना बहुतांशी प्रमाणात उच्च रक्तदाब व मधुमेहाचा त्रास होता.
वय वर्षे १ ते १० मध्ये एका १३ महिन्याचा बालकाचा मृत्यू झाला असून, तो जन्मत:चा अशक्त होता. तर ११ ते २० वयोगटात दोन जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एक विशेष, तर अन्य रूग्ण हा मल्टी ऑरगन फेल्युअर होता. २१ ते ३० वयोगटामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून, यातील एक जण मद्यपी तर एक जण क्षयरोगाने ग्रस्त होता. तर ३१ ते ४० वयोगटातील ८ मृत्यूमध्ये तीन जण हे मद्यपी तर अन्य रूग्ण हे उच्च रक्तदाब व मधुमेह आजाराने ग्रस्त होते.
--------------------
मधुमेह असलेल्या रूग्णांनी विशेष खबरदारी घ्यावी
मधुमेह असलेल्या रूग्णांना कोव्हिड-१९ चा विषाणू आपल्या जाळ्यात लवकर ओढतो. त्यामुळे मधुमेह व श्वसनविकार तथा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सद्यस्थितीला विशेष काळजी घेणे जरूरी आहे. शासनाने दिलेल्या निदेर्शानुसार गर्दी जाऊ नये, योग्य आहार व पहिल्यापासून सुरू असलेली औषधे नियमित घ्यावीत.
डॉ. बबन साळवे़ ,सचिव, बीएमए.
--------------------------