CoronaVirus Positive News : हम होंगे कामयाब!पुणे शहरात नवीन बाधितांपेक्षा कोरोनामुक्तीचा वेग अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 05:47 PM2020-05-07T17:47:58+5:302020-05-07T17:50:52+5:30
मागील काही दिवसांपासून कोरोना संकटात सापडलेल्या पुणेकरांसाठी ही बाब दिलासादायक ठरणारी आहे.
पुणे : शहरात कोरोनाबाधित नवीन रुग्णांमध्ये वेगाने वाढ होत असली तरी आता कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्याही ६०० च्या जवळपास गेली आहे. नवीन रुग्ण दुप्पट होण्याचा वेगही सध्या दहा दिवसांच्या पुढे गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा वेगही केवळ पाच दिवस एवढाच आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोरोना संकटात सापडलेल्या पुणेकरांसाठी ही बाब दिलासादायक ठरणारी आहे.
मागील काही दिवसांपासून शहरामध्ये कोरोनाबाधित नवीन रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. दररोज हा आकडा ८० ते १०० च्या घरात आहे. त्यामुळे बाधित तसेच संशयित रुग्णांना दाखल करण्यासाठी महापालिका प्रशासनाला खासगी रुग्णालयांसह शैक्षणिक संस्थांच्या वसतिगृहांचा आधार घ्यावा लागत आहे. पण असे असले तरी प्रत्यक्ष रुग्णवाढीचा वेग मागील काही दिवसांत तुलनेने वाढल्याचे दिसत आहे. साधारणपणे १५ दिवसांपुर्वी रुग्ण दुप्पट होण्याचा वेग सहा ते सात दिवस एवढा होता. आता हा वेग दहा दिवसांच्या पुढे गेला आहे. तर बाधित रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचा वेग त्यापेक्षा जास्त आहे. दर चार ते पाच दिवसांनी कोरोनामुक्त रुग्णांमध्ये दुपटीने वाढ होत असल्याचे चित्र आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, दि. २० एप्रिल रोजी एकुण बाधित रुग्ण ६६६ तर कोरोनामुक्त रुग्ण ६८ एवढे होते. पुढील पाच दिवसांत बरे झालेल्या रुग्णांचा आकडा दुपटीहून अधिक होता. तर बाधित रुग्णांचा आकडा दुप्पट होण्यासाठी सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला. त्यानंतर हा कालावधी वाढतच चालला आहे. दि. २५ मे रोजी एकुण १ हजार ७० रुग्ण बाधित होते. हा आकडा दुप्पट होण्यासाठी जवळपास १२ दिवसांहून अधिक कालावधी लागल्याचे दिसत आहे. त्यातुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात सातत्य राहिले आहे. रुग्णांची चाचणी घेतल्यापासून पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. त्यानंतर १४ व्या व १५ व्या दिवशी त्याची चाचणी घेऊन ती निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जात आहे. बहुतेक रुग्णांच्या चाचण्या १४ दिवसांनी निगेटिव्ह येत असल्याने कोरोनामुक्त रुग्णांच्या प्रमाणात सातत्य दिसून येत आहे.
----------------
शहरातील बाधित रुग्ण, बरे झालेले व मृत्यूची स्थिती
दिवस एकुण बाधित एकुण बरे झालेले रुग्ण एकुण मृत्यू
९ मार्च ०२ ०० ००
१५ मार्च ०७ ०० ००
२५ मार्च १९ ०२ ००
१ एप्रिल ३९ ०८ ०१
५ एप्रिल ८४ १५ ०५
१० एप्रिल २०९ २४ २६
१५ एप्रिल ३७७ २९ ४१
२० एप्रिल ६६६ ६८ ५०
२५ एप्रिल १०७० १५९ ६९
३० एप्रिल १५१८ २७४ ८५
५ मे १९४३ ५३५ १११
७ मे २०२९ ५८७ ११८
----------------------------------------