कोरोनाचं 'मृत्यूतांडव';१५ दिवसांत महापालिका कर्मचाऱ्यासह कुटुंबातील 3 जणांना कोरोनाने हिरावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 10:11 PM2021-04-23T22:11:08+5:302021-04-23T22:19:26+5:30
आई वडिलांच्या निधनानंतर कुटुंब सावरतं न सावरतं तोच शामसुंदर आणि त्यांच्या भावाचा एकाच दिवशी काल मृत्यू झाला आहे.
पुणे : कोरोनाच्या थैमानाने सर्वांच्याच मनात धडकी भरविली आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. कोरोना कुटुंबच्या कुटुंब हिरावून नेत आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना पुण्यात घडली आहे. पुणे महानगरपालिका हडपसर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा व्यवस्थापन कार्यरत असणारे शामसुंदर लक्ष्मण कुचेकर यांच्यासह कुटुंबातील ३ जणांचा अवघ्या पंधरा दिवसांच्या कोरोनाने कालावधीत मृत्यू झाला आहे. यात आणखी धक्कादायक म्हणजे शामसुंदर आणि त्यांच्या भावाचा एकाच दिवशी म्हणजे गुरुवारी ( दि.२२) मृत्यू झाला आहे.
पुणे मनपा आरोग्य सेवेत ते योग्य म्हणून कार्यरत असतानाच आपली जबाबदारी पार पडत असताना कुटुंबातील सर्वांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. वडील लक्ष्मण कुचेकर यांचे ९ एप्रिलला तर आई सुमन कुचेकर यांचा १६ एप्रिलला मृत्यू झाला होता. या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही तोच काल शामसुंदर व विजय कुचेकर यांचा कोरोनामुळेच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शामसुंदर यांचे वडील लक्ष्मण यांच्यावर शिवाजीनगर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये तर आई सुमन यांच्यावर जहांगीर रुग्णालयात कोरोनावर उपचार सुरु होते. मात्र याच दरम्यान आठ दिवसांच्या आत दोघांनाही कोरोनामुळे गमावले. तसेच शामसुंदर यांच्यावर ४ एप्रिलपासून हडपसर येथील नोबल रुग्णलयात तर विजयकुमार यांच्यावर ९ एप्रिलपासून शिवाजीनगर येथील जम्बोमध्ये उपचार सुरु होते. मात्र गुरुवारी उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील ४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
रूग्णसंख्या कमी होऊनही बेड मिळेना
शहरात गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या वाढीच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.अशावेळी शहरातील विविध रूग्णालयांमधील खाटा रिक्त होणे अपेक्षित होते. मात्र तसे अद्यापही झालेले नाही. सद्यस्थितीला सौम्य लक्षणे असलेले व होम आयसोलेशेनमध्ये (गृह विलगीकरणात) असलेले कोरोनाबाधित १७ दिवसानंतर कोरोनामुक्त झाल्याचे महापालिकेकडून शहानिशा केल्यानंतर जाहिर करण्यात येत आहेत.