Coronavirus Pune :जंबो कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टरच्या आयुष्यातील दिवस !
By प्राची कुलकर्णी | Published: April 7, 2021 10:58 PM2021-04-07T22:58:17+5:302021-04-07T23:02:07+5:30
२०-२२ तासांचा दिवस आणि तणावात काम
पुणे : आता आमच्या दिवसाची सुरूवात कधीही होत आहे. अगदी रात्री दोन वाजता सुद्धा...त्यानंतर पेशंट असतील तितका वेळ काम करावे लागते."पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयात काम करणारे डॉ .ऋषिकिरण पवार गेल्या काही दिवसांमध्ये उसंत मिळणे याचा अर्थच त्यांच्यासाठी बदलला आहे. सलग अर्ध्या तासाची झोप ही आता त्यांच्यासाठी लक्झरी झाली आहे.
३५ वर्षांचे ऋषिकिरण हे जम्बो सुरु झालं तेव्हापासुन इथे काम करत आहेत. घरी आई वडील दोघंही डॉक्टर आहेत. त्यामुळे धावपळ अनुभवलेली आहे.. पण ही धावपळ त्याच्याही पलिकडे असल्याचे ते सांगतात.
“पेशंट आमच्या इमर्जन्सी मध्ये येतात. त्यावेळेस आम्हांला कळवलं जातं. मग आलं की पहिल्यांदा पेशंट्सच्या परिस्थितीचा आढावा घ्यायचा आणि मग पीपीई किट चढवायचं आणि मग सुरु होतात राउंड. एकदा किट घातलं की, पुढचे ६-८ तास तसंच सुरु राहते. त्यात आमच्यासमोर दाखल रुग्णाला स्थिर करणे हे महत्वाचे आणि मोठे जिकिरीचे काम असते. ते झालं की पेशंट शिफ्ट केले जातात. आणि मग इतर पेशंटचा राउंड” असतो असे पवार सांगत होते. पण फक्त पेशंट पाहणंच नाही तर त्यांच्या नातेवाईकांशी बोलणं, त्यांना पेशंटची स्थिती समजावणे हे जिकिरीचे काम देखील डॉक्टरांना करावे लागत आहे.
“सुर्य उगवतो आणि मावळतो म्हणून खरंतर दिवस संपला असे म्हटलं जाते . “ पवार सांगतात. “ खरंतर आम्हांला १२-१५ तास काम करायची सवय असतेच. तसं ट्रेनिंगच असतं. पण एरवी गंभीर रुग्ण आले धावपळ झाली हे आठवड्यातून १-२ वेळाच होत असत. पण आता हे त्याच्या खूप पलिकडे पोहोचले आहे. लोकांचे आयुष्य आमच्या हातात आहे.”
मागील वेळेपेक्षा हे कसं वेगळं आहे हे सांगताना पवार म्हणाले “आता रुग्ण गंभीर होऊनच येतात. त्यातही आधी जे ५०-५५ चा वर गंभीर रुग्ण यायचे त्यात आता तरुणही वाढायला लागले आहेत. “
अर्थात हे सगळं सोपं नाहीच. इकडे झगडताना इन्फेक्शनची भीती असतेच. आणि मग घरच्यांबरोबर कसं मॅनेज करता विचारल्यावर पवार म्हणाले” आम्ही आता घाबरायचं बंद केलं आहे. कोणीतरी इतरांचे जीव वाचवायला हवेतच. ते आम्ही करतोय. आधी घरचे म्हणायचे की का रिस्क घेता. पण आता त्यांनाही हे समजलंय.”
पण हे सगळं करत असतानाच डॅाक्टर्स ही माणसेच आहेत हे लोकांनी समज़ुन घ्यायची आवश्यकता आहे. कोरोनाची ट्रीटमेंट महाग आहे. ती कशी परवडणारी करायची हे सरकारच्याच हातात आहे. पण लोक भांडतात, डॉक्टरांना मारहाण करतात हे ऐकलं की भीती वाटते. म्हणून इतकंच मनापासून सांगावसं वाटते कि आम्हीही माणसंच आहोत, थोडं समज़ुन घ्या.. “