Coronavirus :दिलासादायक! पुणे जिल्ह्यात १७७ रुग्ण कोरोनामुक्त, एकूण रुग्णसंख्या ३ हजार ५६७
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 02:23 AM2020-05-16T02:23:36+5:302020-05-16T02:24:17+5:30
यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५६७ वर जाऊन पोहचली. पण यापैकी आता पर्यंत १८७९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत
पुणे - पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (दि.१५) रोजी एका दिवसांत १७७ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले. तर एका दिवसांत १४१नवीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची भर पडली. यामध्ये गंभीर असलेल्या 5 मृत्यू झाला. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३ हजार ५६७ वर जाऊन पोहचली. पण यापैकी आता पर्यंत १८७९ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, यामुळे सध्या जिल्ह्यात १ हजार ५०२रूग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल आहेत.
पुणे जिल्ह्यात शुक्रवारी सुमारे १ हजार 8 संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १४१ रूग्णांचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले. गेल्या काही दिवसांत प्रशासनाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न करून जास्तीत जास्त संशयित रूग्णांची तपासणी केली जात आहे. यामध्ये देखील कन्टमेन्ट झोन मध्ये अधिक लक्ष केंद्रीत केले जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाढ नेहमीप्रमाणे पुणे शहरामध्ये असून, कॅन्टोनमेन्ट हद्दीत देखील रूग्ण वाढीचा वेग अधिक आहे. तर ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांत ग्रीन झोनमध्ये असलेल्या तालुक्यामध्ये कोरोना शिरकाव होताना दिसत आहे.खेड तालुक्यात प्रथमच एक रूग्ण सापडला आहे. परंतु या रूग्णांची कोरोनाची हिस्ट्री पुणे शहरातील आहे. यामुळे आता शहरी भागा सोबतच ग्रामीण भागावर देखील अधिक लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे.
शहरातील कोरोनाबधितांचा आकडा तीन हजारांचा पार
पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा तीन हजारांच्या पार गेला असून दिवसभरात रूग्णांमध्ये तब्बल १०६ रूग्णांची भर पडली असून १४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात रूग्णांची एकूण संख्या ३ हजार ९३ झाली असून प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण १ हजार २८९ आहेत. दिवसभरात एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १३२ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १०६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ६७ तर खासगी रुग्णालयांमध्ये २९ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ३३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ९९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत.
शहरात शुक्रवारी पाच मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १७४ झाली आहे. दिवसभरात एकूण १४४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील १२३ रुग्ण, ससूनमधील ०६ तर खासगी रुग्णालयांमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ६३० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार २४२ झाली आहे.
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १६५२ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २९ हजार १ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ८७४, ससून रुग्णालयात ११० आणि खासगी रुग्णालयांमध्ये ३०५ रुग्ण उपचार घेत आहेत.
एकूण बाधित रूग्ण : ३५६७
पुणे शहर : ३१०६
पिंपरी चिंचवड : १८४
कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : २७८
मृत्यु : १८६
घरी सोडलेले : १८७९