Coronavirus Pune: ...अखेर पुणे जिल्हा परिषद खरेदी करणार 50 लाखांची रेमडेसिविर इंजेक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 01:39 PM2021-04-16T13:39:54+5:302021-04-16T13:40:47+5:30
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय...
पुणे : पुणेजिल्हा परिषदेने 50 लाख रुपयांचा रेमडेसिविर इंजेक्शनच्या खरेदीचा निर्णय घेतला असून, इंजेक्शनची एकूण खरेदी दोन कोटी रुपये पर्यंत केली जाणार असून त्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. खरेदी आदेश काढून येत्या दोन दिवसात लस उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न असल्याचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांनी सांगितले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये गंभीर कोरोना रुग्णांना आवश्यक असणारे रेमडेसिविर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा असल्याने जिल्हा परिषदेने स्व निधी मधून आपत्कालीन परिस्थितीमध्ये ते उपलब्ध करून दिली जाईल. जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे ,उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची या संदर्भात गुरूवारी बैठक झाली, त्यामध्ये तातडीने हा निर्णय घेण्यात आला.
सद्यस्थितीमध्ये आपत्ती व्यवस्थापनासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद उपलब्ध आहे. त्यामध्ये जिल्हा निधीतून अधिक दीड कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. आज तातडीने 50 लाख रुपयांच्या रेमडेसिविर औषध खरेदीला परवानगी देण्यात आली. उर्वरित निधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांना असलेले अधिकारातून दिला जाणार आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन साठी हाफकिन इन्स्टिट्यूट कडून दर निश्चिती होणार होती, परंतु हाफकिनकडे एकही बोली न आल्याने आता मुंबई महापालिकेने खरेदी केलेल्या दराप्रमाणे किंवा त्यापेक्षा कमी दर आल्यास त्या दराने इंजेक्शन खरेदी केली जातील. ग्रामीण भागातील खाजगी रुग्णालयांमध्ये दाखल असणाऱ्या गंभीर रुग्णांना ही लस खरेदी दारावरच्या किंमतीने उपलब्ध करून दिली जाईल.
लसीचे नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी मार्फत होईल त्यासाठी आगाऊ नोंदणी आणि इंजेक्शन ची आवश्यकता याची पडताळणी करून लस पुरवठ्याचे नियोजन असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेने प्रत्यक्षात निधीची तरतूद करून तो उपलब्ध करून दिला असला तरी इंजेक्शनची उपलब्धता होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.