Coronavirus Pune : 'ससून'मधील कोविड बेड्स अन् आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवा: महापौर मुरलीधर मोहोळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 08:00 PM2021-04-15T20:00:03+5:302021-04-15T20:00:17+5:30
महापौर मुरलीधर मोहोळ यांचे वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र.....
पुणे: कोरोनाचा संसर्ग शहरात वाढत आहे. पुणे महापालिका हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना राबवित आहे. तसेच जास्तीत जास्त मात्र,सध्याची शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता ससूनमध्ये कोविड बेड्स आणि आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमता वाढवा अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. मोहोळ म्हणाले, 'आम्ही जास्तीत जास्त चाचण्या करणे, शहरामध्ये ऑक्सिजन बेडस, आयसीयू बेडस उपलब्ध करणे, लसीकरण वेगाने करणे अशा स्वरूपाचे काम युद्धपातळीवर करत आहोत. मात्र शहरातील वाढती रुग्ण संख्या पाहता त्या प्रमाणात बेडसची उपलब्धता हे सर्वात मोठे आव्हान आमच्यासमोर आहे.
महापालिकेच्या स्तरावर आमची सर्व रुग्णालय आजमितीला पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. शिवाय खासगी रुग्णालयाचे देखील ८०% बेड्स ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र, ससूनमधील बेडसची क्षमता १,७५० असूनही तिथे कोरोना रुग्णांसाठी फक्त ५०० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ससूनमधील ६०% बेडस कोरोना रुग्णांसाठी राखीव केले, तरी याठिकाणी बेडसची संख्या १,०५० इतकी होऊ शकते असेही मोहोळ यांनी सांगितले.
महापौर पुढे महापौर म्हणाले, कोरोनाचा संसर्ग लवकर नियंत्रणात येण्यासाठी RTPCR चाचण्यांची संख्या वाढविणे अत्यावश्यक आहे. आम्ही त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर RT-PCR चाचण्या शहरांमध्ये करत आहोत. दररोज २५,००० ते ३०,००० चाचण्या आम्ही करत आहोत. परंतु यातील फक्त ३,००० चाचण्यांची तपासणी ससून मधील सरकारी लॅबमध्ये केली जातात. उर्वरित चाचण्यांची तपासणी खासगी लॅब मार्फत केली जात आहे. म्हणजेच जवळपास २०,००० पेक्षा जास्त नागरिक जे खासगी लॅबमध्ये चाचण्या करतात, त्यांचे रिपोर्ट तीन ते चार दिवस विलंबाने येत असल्याने त्यांच्यामार्फत शहरात संसर्ग वाढण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणूनच ससूनमध्ये सुरू असलेल्या चाचण्यांची तपासणी क्षमता वाढवण्याची अत्यंत निकड आहे. किमान १०,००० चाचण्यांची तपासणी या ठिकाणी होणे आवश्यक आहे, असेही महापौर मोहोळ म्हणाले.