coronavirus: स्थलांतरीत होत असलेल्या मजूर अन् कामगारांबाबत पुणे महापालिकेचा महत्वपूर्ण निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 06:37 PM2020-03-29T18:37:05+5:302020-03-29T18:38:01+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे
पुणे - कोरोनामुळे देशभरात २२ मार्चपासून देशभरात संचारबंदी जाहीर करण्यात आली़ या निर्णयामुळे पुणे, मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरात राहणारी मंडळी आपल्या गावाकडे परत जाऊ लागली. पुण्यातून गावाकडे जाणाऱ्यांची संख्या वाढली असून परराज्यातील मजूर आणि कामगारही आपल्या-आपल्या राज्यात परतताना दिसत आहेत. राहण्याची आणि जेवणाची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पुण्यातून हा कामगार वर्ग स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे पुणे महापालिकने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन विठ्ठल तुपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन याबाबत माहिती दिली. 'बाहेर गावातील मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये मजुरांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. माहीतीस्तव सोबत यादी जोडली आहे.', असे म्हणत पुणे महापालिकेने दिलेली यादी त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती शेअर केलीय. मजूर/कामगार निवारा केंद्र असे नामांतर करत, कामगार वर्गाच्या राहण्याची सोय शाळांमध्ये करण्यात आली आहे. यासंदर्भातील महापालिकेचं पत्र तुपे यांनी आपल्या ट्विटरवरुन प्रसिद्ध केलंय.
बाहेर गावातील मजुरांचे स्थलांतर थांबविण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये मजुरांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. माहीतीस्तव सोबत यादी जोडली आहे.#FightAgainstCorona#StayHomeStaySafe#मीच_माझा_रक्षकpic.twitter.com/0hol8tVhvo
— Chetan Vitthal Tupe (@ChetanVTupe) March 29, 2020
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्याला जो वेळ मिळाला त्यानुसार आपण काळजी घेतली आहे, परराज्यातील काही मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहेत त्यांना विनंती आहे कुठेही जाऊ नका, जिथे आहात तिथे राहा, तुमची जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे. राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करतोय. काही रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये वर्दळ होत आहे त्याठिकाणी कृपा करुन गर्दी करु नका अन्यथा लोक ऐकणार नसतील तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील असा इशारा त्यांनी दिला. तसेच, परराज्यातील नागरिकांनीही आहे तिथे राहवे, सरकारकडून त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येईल, असेही ठाकरेंनी सांगितले.
सरकार लोकांची मदत करत आहे तुम्हीही सरकारला सहकार्य करा, कोरोनाशी लढण्यासाठी वेगळं खातं उघडलं आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वेगळा विभाग केला आहे. उदय कोटक यांनी १० कोटींची निधी जाहीर केली. अनेक विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मदत करतायेत. सध्याच्या घडीला कोणताही देश मदतीसाठी पुढे येणार नाही त्यामुळे आपणच एकत्र मिळून संकटाला मात करणं गरजेचे आहे. ज्या देशांनी काळजी घेतली नाही त्यांची दुर्दैवी अवस्था आहे. पण संकट भयंकर असताना जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टरांचा अभिमान आहे. सर्व डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.