coronavirus : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ झाले रिकामे ; 60 टक्के विद्यार्थी गेले गावाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 02:16 PM2020-03-15T14:16:38+5:302020-03-15T14:18:36+5:30
काेराेनाचा प्रभाव पुण्यात वाढल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी आपआपल्या घरी परतले आहेत.
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये काेराेनाचा प्रभाव वाढत असल्याने त्याचे परिणाम आता विद्यार्थ्यांवर हाेताना दिसत आहे. पुण्यात सध्या काेराेनाचे 10 रुग्ण आढळून आले असून जिल्ह्यामध्ये ही संख्या 15 वर जाऊन पाेहचली आहे. अशातच आता महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लेक्चर सुद्धा बंद ठेवण्यात आले आहेत. काेराेनाच्या भितीमुळे पालक आपल्या मुलांना गावाला परत बाेलवत असल्याने विद्यापीठातील 60 टक्के विद्यार्थी आपल्या गावी गेल्याचे चित्र आहे.
दुबईवरुन पुण्यात आलेल्या दांपत्याला काेराेनाची सर्वप्रथम लागण झाल्यानंतर आता हळूहळू राज्यातील अनेक काेराेनाबाधित रुग्ण समाेर येत आहेत. देशात सर्वाधिक काेराेनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात आहे. राज्यात 31 जणांना काेराेनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यातील विविध ठिकाणांचे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. त्यांची संख्या अधिक आहे. हे विद्यार्थी विद्यापीठाच्या वसतिगृहात किंवा शहरात इतरत्र रुम घेऊन राहतात. सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव पुणे शहरात अधिक असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विद्यापीठाने लेक्चेर्स बंद ठेवल्याने आता विद्यार्थ्यांचे पालक त्यांना घरी येण्याची विनंती करत आहेत.
विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणारा सतीश पवार म्हणाला, पुण्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहेत. पालक विद्यार्थ्यांना घरी बाेलवत आहेत. सध्या विद्यापीठाने लेक्चर तसेच ग्रंथालय, वाचनालय बंद ठेवल्याने विद्यार्थी आपल्या गावाकडे परतले आहेत. साधारण 60 टक्के विद्यार्थी आपआपल्या घरी गेले आहेत, त्यामुळे सध्या विद्यापीठात शुकशुकाट आहे.
जयकर ग्रंथालय बंद
विद्यापीठामधील सर्वात माेठे ग्रंथालय असणारे जयकर ग्रंथालय काेराेनाच्या प्रभावामुळे बंद ठेवण्यात आले आहे. कधीही बंद नसणारे हे ग्रंथालय काेराेनामुळए बंद करावे लागले आहे. सध्या विद्यार्थी आपआपल्या रुममध्ये अभ्यास करत आहेत. दरम्यान लेक्सर्स नसले तरी विद्यार्थ्यांनी शहर परिसरात फारसे फिरु नये असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. तसेच विद्यापीठाच्या परिसरात फिरताना ओळखपत्र जवळ बाळगण्यास सांगण्यात आले आहे.