Coronavirus: पुन्हा शेअर कॅब? पुण्याची महिला वाशीला लग्नासाठी गेलेली; कोरोना पॉझिटिव्ह आढळली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 09:46 PM2020-03-21T21:46:31+5:302020-03-21T21:47:55+5:30
पुणे- वाशी असा प्रवास या महिलेने पतीसोबत कॅबने केला होता. पुन्हा त्याच कॅबने ती पुण्याला परतली होती.
पुणे/मुंबई : पुण्यामध्ये आज एक चाळीशीतील महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. धक्कादायक म्हणजे ही महिला परदेशात नाही तर मुंबईच्या वाशीला लग्नाला उपस्थित राहण्यासाठी गेली होती. या लग्नात जवळपास १५०० जण आले होते. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.
ही महिला सिंहगड रोड परिसरात राहणारी आहे. ती पतीसोबत ३ मार्चला नवी मुंबईतील वाशीला लग्नासाठी गेली होती. ज्या कॅबने ती गेलेली त्याच कॅबने ती पुन्हा पुण्याला परतली. संबंधित टॅक्सी चालकाने दि. ३ मार्चपूर्वी कोणत्याही परदेशातून आलेल्या प्रवाशाला घेतलेले नव्हते, असे तपासात समोर आले आहे. तर ही महिला ६ व ७ मार्चला पुण्यातच होती. त्यावेळी तिला कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळली नव्हती.
मात्र, ८ मार्चला तिला खोकल्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे दिवसभर घरातच बसून होती. ९ मार्चला ताप आल्याने जवळच्या क्लिनीकमध्ये जाऊन औषध घेतले. १० व ११ मार्चला खोकल्यामध्ये वाढ होऊनही ती १२ मार्चला वरसगाव परिसरात एका जीपने गेली. तिथे ती काही जणांना भेटली. दुसऱ्या दिवशी तने पुन्हा वरसगाव गाठले व येताना एसटीने प्रवास केला. त्रास वाढल्याने तिला १६ मार्चला भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एवढा प्रवास केल्यानंतर भारती हॉस्पिटलमध्ये तिचा एक्सरे काढण्यात आला. त्यात निमोनिया असल्याचे निदान झाले. त्यामुळे स्वाईन फ्ल्यूची शक्यता गृहीत धरून तिचे नमुने ‘एनआयव्ही’मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले. या तपासणीत तिला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.