coronavirus : पुणेकरांचा चहा हाेणार कडू ; अमृततुल्ये राहणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 09:34 PM2020-03-18T21:34:57+5:302020-03-18T21:35:57+5:30
दुकाने आणि हाॅटेलनंतर आता पुण्यातील अमृततुल्ये देखील पुढील दाेन दिवस बंद राहणार आहेत.
पुणे : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययाेजना करण्यात येत आहे. राज्यातील काही शहरांमध्ये जमावबंदी करण्यात आली आहे तर गरज नसताना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशातच पुण्यातील व्यापाऱ्यांना तीन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे तर हाॅटेल देखील बंद ठेवण्यात आले आहेत. यातच आता काेराेनाचा फैलाव हाेऊ नये यासाठी पुण्यातील अमृततुल्य व्यावसायिकांनी देखील आपले अमृततुल्य दाेन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असून दराराेज काेराेनाच्या रुग्णांमध्ये वाढ हाेत आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र न येण्याचे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. पुणेकर आणि अमृततुल्यचं एक वेगळंच नातं आहे. पुण्यातील नाक्यानाक्यावर असणाऱ्या अमृततुल्यमध्ये नेहमीच नागरिकांची गर्दी असते. हाॅटेलच्या चहापेक्षा अमृततुल्यचा चहा नागरिकांच्या अधिक पसंतीचा आहे. परंतु काेराेनाचा प्रादुर्भाव पुणे शहरात वाढत असल्याने आता ही अमृततुल्य देखील बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहर अमृततुल्य व्यावसायिक असाेसिएशनने घेतला आहे.
दरम्यान पुणे शहरातील दुकाने, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने शहरात बुधवारी शांतता हाेती. रस्त्यांवर तुरळक रहदारी हाेती. नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत घरीच राहणे पसंत केले. पुढील काही दिवस पुण्यात हिच परिस्थिती असण्याची शक्यता आहे.