कोरोनाबाधिताचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 04:57 AM2020-04-08T04:57:12+5:302020-04-08T04:57:28+5:30
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावे लागले अत्यंसंस्कार
नीलेश राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोरोनाचा संसर्ग पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असतानाच, यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. हे भयावह चित्र असतानाच आणखी एक हृदय हेलवणारी घटना घडली आहे. कोरोनाची लागण झालेल्या पण आधीच इतर आजारांनीे त्रस्त असलेल्या रूग्णाचा मृत्यू नुकताच झाला. पण केवळ कोरोनाबाधित म्हणून हा रूग्ण गणला गेल्याने त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाइकांनीही ताब्यात घेण्यास नकार दिला. परिणामी महापालिकेच्या यंत्रणेलाच सर्व सोपस्कार पार पाडून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली.
येरवडा येथील एका रूग्णाचा चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. सदर महिला कोरोना बाधित असल्याचे निदर्शनास आल्याने एकच गोंधळ उडाला होता. सर्व प्रशासकीय यंत्रणाही या भागातील सर्वेक्षणाच्या कामात अधिक मनुष्यबळासह एकवटली गेली. खबरदारीचा उपाय म्हणून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आरोग्य तपासणीही करत आहे. हे सुरू असतानाच मृत महिलेचा मृतदेह घेण्यास इतर नातेवाईक पुढे आले नाहीत. तीन दिवस पालिकेतील अधिकाºयांनी संपर्क साधला व मृतदेह ताब्यात घेण्याबाबत सांगितले, मात्र त्यांनी नकारच दिला.
संबधित कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या नातेवाइकांकडून पालिकेच्या अधिकाºयांनी लेखी मागणी केल्याने या मृतदेहावर आमचा काहीही अधिकार नाही असे त्यांनी लिहून दिले. यानंतर तीन दिवसांनी या मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा करून, तो मृतदेह पालिकेच्या संबंधित यंत्रणेकडे अंत्यसंस्कारासाठी दिला गेलाÞ तेव्हा पालिकेने नियुक्त केलेल्या कर्मचाºयांनीच मृतदेह स्मशानभूमीत नेऊन त्यावर अंत्यसंस्कार केले.
केंद्राच्या निर्देशानुसार होत आहेत अत्यंसंस्कार
कोरोनाबाधितांपैकी आठ जणांचा आजपर्यंत पुण्यात मृत्यू झाला असून, या सर्वांवर केंद्र शासनाच्या सूचनानुसार अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाल्यावर त्याचा मृतदेह हा प्लास्टिक च्या विशेष आच्छादनाने आच्छादित करून बंधिस्त केला जातो. हे रोग प्रतिबंधक प्लास्टिक कोट घातलेल्या बॉडीचा फक्त चेहरा दिसावा म्हणून चेहºयाजवळ झिप लावण्यात येते व केवळ त्या मृतदेहाचा चेहरा दाखविण्यापूरताच तो चेहºयाभोवती उघडला जातो. हे कामही पालिकेकडून नियुक्त केलेल्या व रोग प्रतिबंधक ड्रेस परिधान केलेल्या सेवकाकडूनच केले जाते.