Coronavirus: रेमडेसिव्हीर कोरोनावर 'रामबाण' नाही, सरसकट वापर नको; तज्ज्ञ डॉक्टरांचे मत
By प्राची कुलकर्णी | Published: April 10, 2021 03:37 PM2021-04-10T15:37:34+5:302021-04-10T15:39:42+5:30
सरसकट वापर टाळण्याचे आवाहन
रेमडेसिव्हीर हा कोरोना वरचा रामबाण उपाय नसून गरज नसताना अनेकांना इंजेक्शन साठी धावपळ करायला लागत असल्याचं मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे. रेमडेसिव्हीर हे आजाराच्या शोधात असलेलं इंजेक्शन असून कोरोनावर ते काही अंशीच उपयुक्त ठरत असल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहे.
राज्यात सध्या सगळीकडेच रेमडेसिव्हीर चा तुटवडा असलेला पाहायला मिळत आहे. रेमडेसिव्हीर मिळवण्यासाठी लोकांनी अक्षरशः दुकानाबाहेर रांगा लावलेल्या आहेत. यानंतरही अनेकांना गरजे इतके इंजेक्शन्स न घेतात परत जाण्याची वेळ येत आहे. या सगळ्यांमध्ये दुकानांबाहेर गर्दी होऊन तिथे डिस्टन्सिंग चे नियम देखील धाब्यावर बसवले जात आहेत. मात्र रुग्णाचा जीव वाचावा यासाठी धडपडणाऱ्या नातेवाईकांना याची पर्वा न करता तासंतास रांगेत उभे रहावे लागत आहे.
पण रेमडेसिव्हिर हे औषध हा कोरोना वरचा रामबाण उपाय नाही. तसंच अनेक रुग्णांना ते कारण नसतानाही दिलं जात असल्याचं मत तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वरिष्ठ सल्लागार, अतिदक्षता, डॉक्टर समीर जोग म्हणाले ," रेमडेसिव्हीर हे खरं तर रोगाच्या शोधात असलेल्या औषध आहे. वेगवेगळ्या साथी जेव्हा आल्या तेव्हा तेव्हा ते वापरून पाहिलं गेलं. कोरोना वर ते काही अंशी परिणाम करत असल्याच सुरूवातीला वाटलं . पण आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गायझेशन ने अभ्यास करून निष्कर्ष काढला की रेमडेसिव्हिर हे लाईफ सेविंग ड्रग नाही.या इंजेक्शन मुळे होतं काय तर त्यात लक्षणांची तीव्रता कमी होते. कोणतेही औषध हे चाचण्यांवर उतरलेलं औषध नाही. अभ्यासाने हे सिद्ध झालंय की मोर्टलिटी वर रेमडेसिव्हिर चा काहीच परिणाम नाही. त्याने होत काय तर फक्त लक्षणांची तीव्रता कमी होते. मात्र हल्ली डॉक्टर पेक्षा रुग्णाच्या नातेवाईकांकडूनच रेमडेसिव्हीरचा आग्रह धरला जात आहे."
राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे म्हणाले," रेमडेसिव्हीर चार वापर मध्यम स्वरूपच्या इन्फेक्शन मध्ये होतो.सौम्य रुग्णांमध्ये ते वापरलं जात नाही. मध्यम स्वरूपच्या निमोनिया मध्ये त्याचा वापर होतो. ते योग्य वेळी वापरणे आवश्यक आहे. रुग्ण गंभीर झाल्यावर मात्र त्याचा वापर करून फायदा नसतो. मात्र सध्या रुग्णांना जास्त त्रास होऊ नये म्हणून काही प्रमाणात डॉक्टर रेमडेसिव्हिर वापरताना दिसतायेत. आणि गरज पडली तर असावे म्हणून नातेवाईक ही रिमडेसिव्हिर चा साठा करत आहेत. यामागे अर्थातच भीती आहे."
डॉक्टर विजय नटराजन सीईओ सिंबायोसिस रुग्णालय म्हणाले ," रेमडेसिव्हीर चा वापर सरसकट होतो आहे. यामुळे गरजूंना त्याची आवश्यकता भासत आहे. लोक लागू शकेल म्हणून खरेदी करून ठेवत आहे. त्यामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. H1N1चा वेळी जसा औषधांवर निर्बंध घातले होते तसे निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे. टास्क फोर्स ने हे औषध कधी द्यायचा याचा गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या डॉक्टरांनी पाळणे आणि पेशंट नी डॉक्टराना निर्णय घेऊ देणं गरजेचं आहे."