coronavirus : काेराेनाला राेखण्यासाठी ससून रुग्णालयाने शाेधला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 09:11 PM2020-03-19T21:11:37+5:302020-03-19T21:17:51+5:30
काेराेनाचा सामना करण्यासाठी ससून रुग्णलयाच्या डाॅक्टर व कर्मचाऱ्यांसाठी कापडी मास्क तयार करण्यात येत असून ते माेफत वाटण्यात येत आहेत.
पुणे : कोरोनामुळे शहरात भीतीचे सावट असताना दुसरीकडे शासनस्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. संसर्गजन्य आजार असलेल्या कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयाने ‘कापडी मास्क’ तयार केला आहे. रुग्णालयातील डॉक्टर्स, कर्मचारी, विद्यार्थी, रुग्ण यांना संसर्ग होऊ नये यासाठी रुग्णालयाच्या लिनन विभाग (वस्त्रोद्योग) च्या वतीने हा मास्क तयार करण्यात आला आहे. केवळ रुग्णालयाशी संबंधित असणा-या व्यक्तींकरिता या मास्कची निर्मिती करण्यात आली आहे.
लिनन विभागातर्फे रुग्णांकरितांचे कपडे, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे कपडे, मास्क तयार करण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काळजी घेण्याचे आवाहन शासकीय व आरोग्य विभागाकडून करण्यात आले. ससून रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण विविध उपचारासाठी येतात. यामुळे त्यांच्या संपर्कात आल्यानंतर होणा-या संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाने दिला आहे. साधारण 11 मार्चपासून मोठ्या संख्येने कापडी मास्क तयार करण्याचे काम सुरु झाले. अशी माहिती ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वस्त्रपाल सीमा शिरसाठ यांनी दिली. सध्या या विभागात कायमस्वरुपी काम करणारे 5 तर करारपध्दतीनुसार काम करणारे 2 टेलर आहेत. यात महिलांचा देखील सहभाग आहे. एक टेलर दिवसाला साधारण 50 मास्क शिवतो. अशापध्दतीने दिवसभरात 750 ते 800 मास्क शिवून तयार केले जातात. तीन स्तरांमध्ये हा मास्क तयार करण्यात आले असून संसर्गजन्य व्यक्तींपासून कुठलाही आजार होणार नाही याची काळजी त्याव्दारे घेण्यात आली आहे. हा मास्क ‘युज अँन्ड थ्रो’ प्रकारचा नसून तो गरम पाण्यात धुवून पुन्हा वापरता येत असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.
कोरोनाच्या भीतीमुळे मास्क तयार करण्याच्या कामाच्या वेळेत देखील बदल झाला आहे. आता सकाळी दहा ते सायंकाळी उशिरापर्यंत काम करावे लागते. मात्र कोरोनाशी सामना करायचा असल्यास सध्यातरी आपल्याकडे मास्क वापरण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ते काम वेगाने पूर्ण करणे गरजेचे आहे. असे मास्क तयार करणा-या एका महिला टेलरने सांगितले. आतापर्यत 2500 हून अधिक मास्कचे वाटप करण्यात आले असून त्याचे निर्मितीमुल्य 22 इतके आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाशी संबंधित व्यक्तींना त्याचे मोफत वाटप केले जात आहे. मास्कच्या वितरणाची व्यवस्था नर्सिंग विभागात करण्यात आली आहे. हे मास्क तयार करण्यात वस्त्रपाल निलेश भोते, टेलर कांता गुंड, सुधीर राक्षे, शारदा कांबळे, कांता बेंडारी, काजल बिवाल, भागीरथी गायकवाड, स्नेहा क्षीरसागर, ललिता ओव्हाळ, जगन्नाथ कागे आणि गौरी गोहिरे यांचा सहभाग आहे.
प्रत्येक व्यक्तीपर्यंत मास्क पाेहचावे यासाठी प्रयत्नशील
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नागरिकांनी शक्य तितकी काळजी घेणे गरजेचे आहे. ससून रुग्णालयातील वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेले मास्क सुरक्षित आहेत. त्याच्या निर्मितीकरिता त्या विभागाला व कर्मचारी यांना धन्यवाद द्यावे लागतील. कमीत कमी कालावधीत त्यांनी मोठ्या मेहनतीने मास्कचे वितरण रुग्णालयात केले. यापुढील काळात रुग्णालयातील प्रत्येक व्यक्तीपर्यत ते मास्क पोहचावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. - डॉ.अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय