coronavirus : ससून रुग्णालयाचा कोरोना प्रोटोकॉल राज्य सरकारला सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 09:32 PM2020-04-02T21:32:58+5:302020-04-02T21:33:42+5:30
काेराेनाशी कशाप्रकारे लढा द्यावा याबाबतचा प्राेटाेकाॅल ससून रुग्णालयाने तयार केला असून ताे मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
राजानंद मोरे
पुणे : कोरोना बाधित रुग्णांवरील उपचार, डॉक्टर व परिचारिकांना घ्यायची दक्षता, विलगीकरण, औषधांचे डोस, विविध उपाययोजना आदी बाबींचा अभ्यास करून ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी कोरोना प्रोटोकॉल तयार करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. ससून रुग्णालयातील तज्ज्ञांनी तयार केलेले स्वाईन फ्लुचे प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केले होते. त्यामुळे कोरोनाच्या प्रोटोकॉललाही मान्यता मिळाल्यास त्यानुसार पुढील उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे.
देशात २००९ मध्ये स्वाईन फ्लुने डोके वर काढले. देशातील पहिल्या मृत्यूची नोंद पुण्यात झाली. त्यानंतर संपुर्ण देशातच स्वाईन फ्लुच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत गेली. देशातील सर्वाधिक मृत्यूची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. या आजाराचा सामना करताना कोणती दक्षता घ्यावी, उपचार कसे असावेत, रुग्णांचे विविध गट, त्यांचे विलगीकरण, त्यानुसार औषधोपचार, अतिदक्षता कक्षातील सुविधा, रुग्णावर उपचार करताना घेण्याची काळजी, चाचणी आदी मुद्यांबाबत ससून रुग्णालयातील विविध विभागातील तज्ज्ञांनी प्रोटोकॉल तयार केला होता. हा प्रोटोकॉल जागतिक आरोग्य संघटनेनेही मान्य केला होता. त्याआधारे पुढे राज्य शासनानेही स्वाईन फ्लुच्या उपचारांसंदर्भात अंतिम प्रोटोकॉल तयार केला.
कोरोना विषाणुचा देशातील वाढता प्रभाव लक्षात घेऊन स्वाईन फ्लुच्या धर्तीवर कोरोनासाठीही प्रोटोकॉल तयार करण्याचे काम ससून रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांनी हाती घेतले होते. यामध्ये प्रामुख्याने उपचार पध्दत, रुग्णांच्यी प्रकृतीनुसार औषधोपचार, विलगीकरण कक्षात जाताना वैद्यकीय कर्मचाºयांनी घ्यावयाची दक्षता, कोणत्या रुग्णांची चाचणी घ्यावी, त्याचे अहवाल आल्यानंतर पुढील उपाययोजना, अतिदक्षता कक्षातील सुविधा आदीचा त्यामध्ये समावेश आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यावर अंतिम संस्कार कसे करावेत, यासंदर्भातही प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. नुकताच हा प्रोटोकॉल राज्य शासनाला सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडे जाईल. त्यानंतर त्यावर अंतिम मोहोर उमटेल.
स्वाईन फ्लुप्रमाणे कोरोनासाठीही तांत्रिक समितीने प्रोटोकॉल तयार केला आहे. राज्य शासनाला हा प्रोटोकॉल सादर करण्यात आला आहे. कोरोनावरील उपचारपध्दतींसाठी आवश्यक उपाययोजनांचा त्यामध्ये समावेश आहे.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय