coronavirus : पुण्यात अद्याप जमावबंदी लागू नाही मात्र ; एकत्र न येण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 06:23 PM2020-03-16T18:23:58+5:302020-03-16T18:32:26+5:30
पुण्यात जमावबंदी लागू करण्यात आली नसून 144/1 कलम लागू करण्यात आले आहे. ज्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना आपले अधिकार वापरता येणार आहेत.
पुणे : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य सरकारकडून विविध पाऊले उचलण्यात येत आहे. राज्यभरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून मुंबईमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पुण्यात 144 कलामांतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली नसून कलम 144 /1 लागू करण्यात आला आहे. या कायद्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारांचा त्यांना वापर करता येणार आहे. त्याचबराेबर टुर्स, ट्रॅव्हल कंपन्या आणि हाॅटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडील परदेशी नागरिकांची माहिती लपविल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
पुण्यात आयाेजित पत्रकार परिषदेमध्ये 144 / 1 पुण्यात लागू केल्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी स्पष्ट केले. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील काेराेनाबाधित रुग्णांची संख्या 16 वर गेली आहे. तर राज्यातील काेराेनाबाधितांची संख्या 39 झाली आहे. काेराेनाचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून माेठ्याप्रमाणावर खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 /1 लागू केले आहे. यापूर्वीच माॅल, मल्टिप्लेक्स, स्विमिंग पूल, जिम बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले हाेते. त्याचबराेबर सर्व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी एकत्र न येता गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
काय आहे कलम 144/ 1
या कलमाअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्र न येण्याबाबत तसेच जी आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश साथ नियंत्रण कायद्याअंतर्गत दिले आहेत, त्याचे उल्लंघन केल्यास त्यावर कायदेशीर कारवाई जिल्हाधिकाऱ्यांना करता येणार आहे. त्याचबराेबर ज्या टुर्स, ट्रॅव्हल कंपन्या, तसेच हाॅटेल्स यांनी परदेशी नागरिकांबाबतची माहिती लपवली असेल त्यांच्यावर देखील या कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.